लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यात टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाण्याअभावी जळालेल्या व वाळलेल्या पिकांची भेट देवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना वीज पंपासाठी तातडीने कनेक्शन न दिल्यास आणखी तीव्र स्वरूपात आंदोलनाचा इशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी दिला आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महावितरण कंपनी आणि राज्य शासनातील परस्पर समन्वय आणि उदासीन यंत्रणेमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना शेतीपंप कनेक्शन मिळत नाही. राज्य सरकारकडून वेळेत अनुदान येत नसल्याने नवीन पंपांची कनेक्शन रखडली असून पाण्याअभावी पिके जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नी तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित असतानाही संबंधित यंत्रणेची डोळेझाक होत आहे. जिल्ह्यातील अनेक नागरिकांची शेतीवरच उपजीविका असून निसर्गाच्या अवकृपेमुळे विहीर, नदी, कॅनॉल, तलाव आदी ठिकाणच्या पाण्यावरच पिके घ्यावी लागतात. शेतात पाणी नेण्यासाठी डिझेल पंप किंवा विद्युत पंपाचा वापर अनिवार्य ठरतो. डिझेल इंधन वापरण्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बहुतेक सर्व शेतकरी वीज वितरण कंपनीकडून वीज कनेक्शन घेवून त्याद्वारे पाणी उपसा करतात व पिकास पाणी देतात. मात्र, कनेक्शन देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असूनही महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची गैरसोय होईल, अशीच कृती केली जात आहे. ज्या प्रमाणात मागणी आहे. त्या तुलनेत कनेक्शन दिले जात नसल्याने दिसून येत आहे. शेती पंपाची कनेक्शन मिळण्यासाठी महावितरणकडे केल्या जाणाऱ्या अर्जांना केवळ फाईल बंद ठेवण्यातच संबंधित अधिकारी धन्यता मानताना दिसत आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.गोरगरीब व सर्वसामान्य शेतकरी पीक कर्जाच्या रुपाने पैसे बाजूला ठेवून शेतीपंपासाठी अर्ज करतात. त्यासाठी पंपखरेदी करून अन्य सर्व प्रकारची तयारी करतात. मात्र, मीटर आणि खंबाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना कनेक्शन घेता येत नाही.
अधिकाऱ्यांना वाळलेल्या पिकांची भेट
By admin | Published: May 25, 2017 11:15 PM