सातारा: सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुकवरील अधिकृत पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून रविवारी रीतसर तक्रार करण्यात आली असून, संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
असंख्य फॅन फॉलोईंग असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या फेसबुक पेजवर दररोज शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केले जातात. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून अँडमिनचा अॅक्सेस काढून घेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पेजवर सर्च केल्यानंतर हे पेज हॅक केल्याचे स्पष्ट झाले.
याबाबतची रीतसर तक्रार सातारा सायबर सेलकडे करण्यात आली असून, त्या पेजवर कोणतीही अनधिकृत पोस्ट अपलोड झाल्यास त्यास संबंधित हॅकर जबाबदार असेल. तसेच अनधिकृत पोस्ट फाॅरवर्ड केल्यास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.
अमेरिकेतील कार्यालयाला सायबर सेलकडून मेल...
सायबर सेलने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून, अमेरिकेतील फेसबुक कार्यालयाशी मेलद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज नेमके कोठून व कोणी हॅक केले, याची माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती मिळण्यास कधी चार दिवस तर कधी चाळीस दिवसही लागत असल्याचे सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.