सातारा : जिल्ह्यात दुष्काळ पडला असताना सर्वस्तरातील पाणीपट्टीत भरमासाठ वाढ करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार तत्काळ रद्द करावा. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करुन उरमोडी धरणातील पाण्याची पळवापळवी केली आहे. याची चाैकशी करुन संबंधितांना निलंबीत करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना संघटनेने निवेदन दिले आहे.यामध्ये म्हटले आहे की, संपूर्ण सातारा जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्हात दुष्काळ असताना आचानक सर्वस्तरावरील पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला आहे. हा प्रकार तत्काळ रद्द करण्यात यावा. तसेच याबाबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात चौकशी केली असता असा निर्णय कुठेही झालेला नाही. फक्त सातारा जिल्ह्यात लागू करुन शेतकऱ्यांना फसविणे व लुटण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी रक्कम भरणार नाहीत.सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्याची पळवापळवी आधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कण्हेर भुयारीमार्गाने राजकीय दबावाखाली आणि अर्थपूर्ण तडजोडी करून केली आहे. त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहणार आहेत. अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच त्यांच्या सपंत्तीची चाैकशी करावी.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जूनभाऊ साळुंखे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, उपतालुकाप्रमुख संजय जाधव यांच्यासह राजू घाडगे, उमेश घाडगे, जनार्दन आवारे, महादेव डोंगरे, संतोष घाडगे, शशिकांत घोरपडे, रावसाहेब घोरपडे, सुधाकर शितोळे, विश्वासराव घोरपडे आदी उपस्थित होते.
उरमोडीच्या पाण्याची पळवापळवी; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
By नितीन काळेल | Published: October 09, 2023 7:08 PM