लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : सांगली, बारामती औद्योगिक शहरांना जोडणारा मिरज-भिगवण राज्य मार्गावरील मायणी-दहिवडी या सुमारे तीस किलोमीटरच्या राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एक फुटांपेक्षा अधिक खोलीचे खड्डे पडल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होते आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून अधिकारी, लोकप्रतिनिधीची नेहमीची वर्दळ असते. पण त्यांनाही हे खड्डे दिसत नसल्याने वाहनचालकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा, पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध औद्योगिक शहरे म्हणून प्रसिद्ध असलेल्या बारामती, सांगली या शहरांच्या परिसरातील औद्योगिक क्षेत्रातून मोठी व अवजड वाहतूक करण्यासाठी एकमेव राज्य मार्ग असलेल्या मिरज भिगवण राज्यमार्गावर मायणी ते दहिवडी या सुमारे तीस किलोमीटर अंतराच्या राज्यमार्गावर गेल्या पंधरा वीस वर्षांपासून मोठा निधी पडला नाही. प्रत्येक वेळी या मार्गाची मलमपट्टी केली जात आहे.
स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती विचारली असता हा मार्ग केंद्राकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद किंवा राज्य शासनाकडून या मार्गावर टाकता येत नाही, अशी उत्तरे देऊन चालढकल केली जात आहे. किंवा त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. केंद्राकडे वर्ग केलेल्या याच मार्गावरील सांगली जिल्ह्यात वर्षानुवर्षे निधी पडत आहे. फलटण तालुक्यातील पूर्व भाग व माण तालुक्यातील उत्तर भागामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये या मार्गावर चांगला निधी पडला होता. हा मार्ग जवळजवळ खड्डेमुक्त झाला आहे. मात्र खटावसह माण तालुक्याला जोडणारा व खटाव तालुक्यातील तडवळे, बोंबाळे, कातरखटाव, सूर्याचीवाडी, धोंडेवाडी, मायणी व सांगली जिल्हा भागातून जाणाऱ्या सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक वर्षांत फक्त पावसाळ्यानंतर खड्डे भरण्याचे काम करून हात झटकले जात आहे.
चौकट
साईडपट्ट्याही खचलेल्या
सध्या एक फुटापेक्षा अधिक खोलीच्या पडलेल्या खड्ड्यांमुळे व खचलेल्या साईडपट्ट्या यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाही मणक्याचा त्रास होत आहे. तरीही या मार्गाच्या दुरुस्तीकडे किंवा केंद्रातून काम व निधी उपलब्ध करण्यात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ सोशल मीडियावरून करत आहेत.
चौकट
प्रतीक्षा निधीची
गेल्या तीन वर्षांपूर्वी हा राज्यमार्ग केंद्राकडे वर्ग केला आहे. केंद्रामध्ये भाजपची सत्ता. केंद्रीय रस्ते विकास व अवजड वाहतूक मंत्री महाराष्ट्रातील तसेच खटाव- माण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीही भाजपचे असा योगायोग असतानाही या मार्गावर निधी उपलब्ध होतो की नाही या प्रश्नाचे उत्तर मात्र सुटताना दिसत नाही.
१८मायणी-रोड
मिरज-भिगवण या राज्यमार्गावर मायणी-दहिवडी या तीस किलोमीटरवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. (छाया : संदीप कुंभार)