मुराद पटेलशिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटामध्ये एका अज्ञात टँकरमधून ऑईल सांडल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्र, खंडाळा पोलिस यांनी शिरवळ रेस्क्यू टिम व महामार्ग देखभाल दुरुस्तीचे संकेत गांधी यांच्या सहकार्याने १२ तासांच्या सफाई मोहिमेनंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, पुणे ते सातारा जाणाऱ्या महामार्गावर खंबाटकी घाटातील भैरवनाथ मंदिर परिसरात मध्यरात्री सातारा बाजूकडे निघालेल्या एका टँकरमधून मोठ्या प्रमाणावर महामार्गावर ऑईल सांडले होते. भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्राला याबाबत माहिती मिळाली. यावेळी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी व महामार्ग दुरुस्ती देखभालच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर माती पसरवून ऑईलचे प्रमाण कमी केले. महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रस्ता साफसफाई करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र सफाई मोहिमेनंतर या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू झाली.
Satara: खंबाटकी घाटात ऑईल सांडले, वाहनचालकांची कसरत; १२ तासांच्या सफाई मोहीमेनंतर वाहतूक सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 5:59 PM