मल्हारपेठ : इतिहास काळात राजाश्रय लाभलेल्या लोककलाकारांच्या कलेची हवा सध्याच्या सरकारने काढून घेतली. लोककलेच्या माध्यमातून ग्रामीण भागात ज्वलंत कथानकाद्वारे समाजजागृती करणाऱ्या वृद्ध कलाकारांना वाढीव मानधन सुरू करून ग्रामीण कला संस्कृतीला चालना देण्यासाठी मराठी चित्रपटांप्रमाणे सरसकट अनुदान द्यावी, अशी ग्रामीण कलाकारांच्यातून मागणी होत आहे.पुरातन काळापासून लोकरंजनातून करमणुकीतून समाजजागृती करणे हा पूर्वी ऐतिहासिक कालखंडातील रिवाज होता. यामुळे या लोककलेला राजाश्रय मिळाला होता. या सर्व कला जोपासून जतन करून त्या ग्रामीण भागात लोकनाट्य कलापथक याद्वारे सादर केल्या जातात. त्यातील ‘लोकनाट्य तमाशा’ ही कला व त्यातील वृद्ध कलाकार ऐतिहासिक प्रसंग उभे करून लोकांचे पोटभरून मनोरंजनातून समाजजागृती करत आहेत. काळाच्या ओघात तंत्रज्ञान विकसित होऊन चित्रपट व्यवसायाला गती आली. रस्त्यावरील सिनेमा, तंबूमधील सिनेमा आता मल्टिसिनेमा, डिजिटल सिनेमा थिटरमध्ये गेला. टीव्ही चॅनेलद्वारे थेट घराघरात गेले. घरबसल्या सर्व करमणूक कार्यक्रम बघण्याची सोय झाली. यामुळे उघड्यावर होणारे कार्यक्रम दिसेनासे झाले. धनदांडग्या सिनेमानिर्माते, व्यावसायिकांनाच सरकारने लोककला जिवंत ठेवण्याच्या नावाखाली उचलून धरले व ५० लाखांपर्यंत अनुदान सुरू केले. यामुळे आर्थिक भांडवलदार या व्यवसायात पैसा गुंतवून नवनव्या चित्रपटांची निर्मिती करून अनुदान लाभ घेऊ लागला. मोठ्या निर्मात्यांना अनुदानाचा लाभ होतोय. मात्र, वृद्ध कलाकारांनी प्रत्यक्षात खेड्या-पाड्यात कलेचे सादरीकरण करून अजूनही कला जिवंत ठेवण्यासाठी जो ऐतिहासिक पुरावा ठेवला त्यास अजूनही जोड नाही.सध्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू झालाय. त्यामध्ये उघड्यावरचा लोकनाट्य तमाशाचा फड उभा असल्याचे पाहावयास मिळतो. त्यामध्ये इतिहासाची साक्ष देणारे प्रसंग राजा, प्रधान व सर्व रसिकांना पोट धरून हसवणारी दोन जोड गोळी म्हणजे पोलीस वेशातील हवालदार ही मंडळी वयाने सत्तरी पार केलेली; परंतु समाजात अजूनही लोककला जिवंत असणारी साक्ष यांच्या संदेशातून जाते. या महाराष्ट्राला सांस्कृतिक ठेवा जपणारी कलाकार मंडळी उपाशी तर पैसा मिळविण्यासाठी अनुदानाचा लाभ घेऊन सिनेमा तयार करणारी धनदांडगे तुपाशी, असे सध्याच्या सांस्कृतिक कला संच नाट्याच्या धोरणातून लोकांपुढे प्रकार येत असल्याने ग्रामीण उपेक्षित सर्व स्थरातील कलाकारांना मानधन देऊन सन्मानित करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)वास्तवदर्शनाचे वेध अन् ताज्या घटनाग्रामीण भागात यात्रांच्या दिवसामध्ये येणाऱ्या लोककला किंवा तमाशामध्ये वास्तवदर्शनाचे वेध असतात. समाजात सुरू असलेल्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टींवर मार्मिक भाष्य करून त्याद्वारे लोकजागृतीचे काम यातून होते. इरसाल ग्रामीण बाज असलेली भाषा यात अधिकचे रंग भरते.दिल्लीपासून गल्लीपर्यंत वेध या लोककलेमध्ये घेण्यात येतो. त्यामुळे राजकारण असो, नैसर्गिक आपत्ती वा सामाजिक क्रांतीचा एखादा विषय. या सर्व गोष्टींचा आणि घटनांचा ऊहापोह या लोककलांच्या माध्यमातून करण्यात येतो. त्यामुळे आजही ग्रामीण भागात या लोककलांचे स्वागत केले जाते.तमाशातील कलाकारांची अवस्था डोळ्यांत पाणी आणणारी!चेहऱ्यावर मेकअप चढवून मायबाप रसिक प्रेक्षकांना दिलखुलास हसविणाऱ्या तमाशातील कलाकारांची अवस्था डोळ्यांत पाणी आणणारी आहे. आधुनिकतेच्या नावाखाली येऊ घातलेल्या संस्कृतीमुळे या कलाकारांचा जीव गुदमरू लागला आहे. त्यामुळे त्यांना दोन वेळचे अन्नही अगदी बेताचेच मिळत आहे. काही गावांनी वादाचे प्रसंग उद्भवतात म्हणूनही यात्रेत तमाशा बंद केला, त्यामुळे कलाकारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
वृद्ध कलाकारांना मानधनाची गरज
By admin | Published: December 03, 2015 9:54 PM