महामार्गालगत अनेक झाडे असतात. मात्र, नजीकच्या शेतजमिनीवर त्याची सावली पडून पिकाला फटका बसत असल्यामुळे झाडांची कत्तल करण्याचे प्रकार वारंवार घडतात. मात्र, बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मल्हारपेठ येथेही एका जुन्या वृक्षाला अज्ञाताकडून आग लावण्यात आली. स्थानिकांकडून हा वटवृक्ष वाचविण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न करण्यात आले. मात्र, आगीमुळे वृक्षाचा बहुतांश भाग जळाला असून तो धोकादायक बनला आहे. येथे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात घडू शकतात. दुर्दैवाने येथे कोणताही गंभीर अपघात घडला आणि त्यात कोणतीही जीवितहानी झाली तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय स्थानिक मंडळी वारंवार अशा पद्धतीने या वटवृक्षाला आग लावत असून याबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नाही.
वटवृक्षास आग लावण्यात आल्याने असे वृक्ष धोकादायक बनतात. त्यानंतर धोकादायक वृक्ष म्हणून त्याची तोड केली जाते. त्यामुळे असे प्रकार रोखणे अत्यावश्यक बनले आहे. याशिवाय वृक्षांना आग लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.