पुसेगाव : पुसेगाव-सातारा रस्त्यावर नेर फाट्यानजीक झालेल्या अपघातात भाटमवाडी येथील दुचाकीस्वार वृद्ध जागेवरच ठार झाला. दिनकर शंकर चव्हाण (वय ६५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
दिनकर चव्हाण हे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरून पुसेगावकडे दवाखान्यात येत होते. त्यावेळी नेर फाट्यानजीक त्यांन अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दिनकर चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, उपनिरीक्षक लोंढे-पाटील व पोलीस कर्मचारी पोहोचले. धडक देऊन पळून गेलेल्या वाहनाचा तपास सुरू आहे.
दरम्यान मयत दिनकर चव्हाण यांचे पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. सध्या सातारा-लातूर या राज्यमार्गाचे काम सुरू आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. बऱ्याच ठिकाणी सूचनांचे फलकही लावले नाहीत. जागोजागी खाली-वर रस्त्याची पातळी, काँक्रिटीकरण करताना ताज्या कामात उमटलेले दुचाकी गाड्यांच्या टायरचे व्रण असल्याने इतर दुचाकी वाहने चालवताना अडचणी येत असतात. या रस्त्याला दुभाजक नसल्याने कोणीही कसाही गाडी चालवून दिवसेंदिवस अपघातात वाढच होत चालली आहे. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.