वाई :
तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पाऊस आणि जोरदार वाऱ्याने कोंढावळे येथे अंगावर घराचे छत कोसळून वामन जाधव ( वय ६५ ) यांचा मृत्यू झाला.
वाई तालुक्यातील पश्चिम भागात कोंढावळे गावाच्या हद्दीतील पूर्व दिशेला असणाऱ्या सुतारकी नावाच्या शिवारातील ओढ्याच्या कडेला गेल्या कित्येक वर्षांपासून पाच ते सहा कुटुंबे गवती छपरे घालून राहत आहेत. यापैकी एका छपरात वामन जाधव हे वयोवृद्ध गृहस्थ एकटेच राहत होते. त्यांची मुले, सुना शेजारच्या छपरात राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम भागात पावसाबरोबर वेगवान वारेही सुरू आहे. या वेगवान वाऱ्यामुळे झोपेत असणाऱ्या वामन जाधव यांच्या अंगावर मध्यरात्रीच्या वेळी हे छप्पर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी वडील झोपलेले छप्पर जमीनदोस्त झाल्याचे पाहून वडिलांचा शोध मुलगा आणि सुनेने सुरू केला असता ते सापडले नाही. त्यांनी जमीनदोस्त झालेले छप्पर उचकटण्यास सुरुवात केल्यानंतर वामन जाधव हे त्या ठिकाणी मृत अवस्थेत सापडले. प्रशासनाने वामन जाधव यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी वस्तीतील नागरिकांनी केली आहे.