सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाकाठी वसलेल्या नित्रळ या गावातील स्थानिक वृद्ध शेतकऱ्याचे घर डोंगराला लावलेल्या आगीत भस्मसात झाले. वणव्याने एका वृद्धाचे घर आणि संसारोपयोगी साहित्य गिळले असून या वृद्धाला प्रशासनाने तत्काळ मदत देण्याची मागणी आहे.
उरमोडी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात नित्रळ हे छोटे गाव आहे. काळेश्वरी डोंगराच्या पायथ्याला केदारनाथ मंदिराशेजारी ८ ते १0 घरांची वस्ती आहे. सोमवारी (दि. ८) दुपारी काही विघ्नसंतोषींनी काळेश्वरी डोंगरात वणवा लावला. ही आग स्थानिक लोकांच्या लक्षात आली नाही. लोक झोपी गेले. त्यानंतर ही आग वाढली. तिने रौद्ररूप घेतले. आगीमध्ये स्थानिकांनी लावलेली आंब्याची झाडे जळाली. दुर्मीळ वृक्षही जळून खाक झाले. तसेच नित्रळ येथील वृद्ध विठ्ठल गणू वांगडे यांच्या जुन्या घराला या आगीची झळ बसली. या आगीत या घरातील सागवानी लाकडे जळून खाक झाली. बघता-बघता हे घर कोसळले. आगीच्या झळा आणि धुरामुळे मध्यरात्रीनंतर स्थानिक लोकांना जाग आली. त्यांनी धरणातील पाणी आणून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र शेतामधील आंब्यांच्या शेकडो हुंड्यादेखील जळून खाक झाल्या. लोकांना जाग आल्याने पुढील अनर्थ टळला. लोक जागे झाले नसते तर ही आग आटोक्यात आली नसती. रात्रीतच सर्व घरांना तसेच फार्म हाऊस आणि आंब्याची बाग जळाली असती. मात्र लोक जागे झाल्याने पुढील अनर्थ टळला.
वनविभागाने गस्त वाढविण्याची मागणी
सातारा शहराच्या पश्चिम भागात डोंगरांची मोठी रांग आहे. या डोंगररांगेत विपुल वृक्षसंपदा आणि वन्यप्राणी, दुर्मीळ पक्षी पाहायला मिळतात. मागील आठवड्यापासून या डोंगररांगांना जागोजागी वणवा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. काही विघ्नसंतोषी लोक नेमकी सायंकाळची वेळ साधून वणवे लावत असल्याने वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आग वाढते. आग विझवताना अनेकांची होरपळ होते. मात्र, मर्यादित साधनांमुळे आग वाढून वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे. या परिस्थितीत वनविभागाने डोंगरभागात गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहेत.
जाळपट्टे काढले असते तर...
कास पठार, काळेश्वरीचा डोंगर, गणेशखिंड परिसर, पेढ्याचा भैरोबाचा डोंगर या भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून वणवा लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या डोंगरांमध्ये जाळपट्टेच काढले गेले नसल्याने आग आटोक्यात येत नाही. उलट ती आणखी वाढते. यासाठी वनविभागाने लोकसहभागातून जाळपट्टे काढावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.
कोट..
उरमोडी धरणाच्या कडेला आमचे जुने घर होते. त्यात लाखमोलाचे साहित्य जळून खाक झाले आहे. वणवा पेटवणाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.
- विठ्ठल वांगडे, नुकसानग्रस्त ग्रामस्थ, नित्रळ
फोटो ओळ : सातारा तालुक्यातील नित्रळ या गावातील जुने घर आगीत भस्मसात झाले.
फोटो नेम : ०९नित्रळ