सातारा : आवक कमी असल्याने जिल्ह्यातील बाजार समिती आणि बाजारपेठेतही कांद्याचा भाव वाढू लागला आहे. त्यातच जुना कांदाही जवळपास संपल्याने व दर वाढल्याने शेतकरी आता पूर्ण वाढ नसणारा कांदाही बाजारात आणत आहेत. त्यामुळे सध्या कांदा विक्रीचा किरकोळ दर ५० रुपयांच्या पुढे गेला आहे.
जिल्ह्यात खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्हा हंगामांत कांद्याचे पीक घेण्यात येते. यामधील एखादा तरी हंगामातील कांद्याला चांगला दर मिळतो. काही शेतकरी तर विविध टप्प्यांत कांदा पीक घेतात. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून कांद्याला चांगला दर मिळत आहे. सुरुवातीला सातारा बाजार समितीत साडेसहा हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. त्यानंतर कांद्याची आवक वाढल्याने भाव पुन्हा कमी झाला. पण, २० रुपयांच्या खाली कांदा आलाच नाही. तर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटविली. त्यामुळे कांद्याचा दर पुन्हा वाढला. आतातर बाजारात जुना कांदा येणेच बंद झाले आहे. त्यामुळे शेतकरी नवीन कांदा घेऊन येत आहेत. या कांद्यालाही चांगला दर मिळतोय.
सातारा बाजार समितीत तर मागील आठ दिवसांपासून क्विंटलला चार हजार रुपयांपर्यंत दर येत आहे. हा दर अजूनही टिकून आहे तर सोमवारी बाजार समितीत आल्याला सर्वच कांद्याला क्विंटलला एक हजारापासून चार हजारांपर्यंत दर मिळाला. पुढील एक महिनातरी कांद्याचा दर टिकून राहील, अशी स्थिती आहे. कांद्याचा दर वाढल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
चौकट :
मागणी कमी पण दर वाढलेलाच...
कोरोनामुळे अजूनही पर्यटन व्यवसाय फुल्ल सुरू झालेला नाही. त्यातच शाळा, महाविद्यालयेही सुरू आहेत, त्यामुळे पर्यटनासाठी कोणी फारसे जात नाही. परिणामी हॉटेल व्यवसायिकांतून मागणी कमी आहे असे असले तरी बाजारात कांदाही कमी येत आहे. त्यामुळे कांद्याचा दर वाढलेला आहे.
................
कोट :
सातारा बाजार समितीत जुना कांदा येण्याचे बंद झालेले आहे. सध्या शेतकरी नवीनच कांदा आणतात. पण, दर वाढल्याने अनेक शेतकरी अपरिपक्व कांदाही आणतात तरीही आवक कमी असल्याने दर चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आहे. पुढील एक महिनाभर कांद्याचा दर असाचा टिकून राहण्याची शक्यता आहे.
- इफ्तेकार बागवान, कांदा व्यापारी, सातारा
फोटो दि.१५सातारा कांदा नावाने...
फोटो ओळ : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. (छाया : नितीन काळेल)
........................................................