प्रमोद सुकरे - कऱ्हाड --महाआघाडीने हिसकावून घेतलेली शेती उत्पन्न बाजार समिती माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलीच. त्याच्या सभापती, उपसभापतिपदाची निवड मंगळवार, दि. २२ रोजी होत आहे. त्यात नव्या-जुन्यांचा आणि कऱ्हाड उत्तर दक्षिणचा मेळ घालत उंडाळकर जुन्याच पैलवानांना संधी देणार की, नव्या खेळाडूंना, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सहा वर्षांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली उंडाळकर विरोधी महाआघाडी अस्तित्वात आली. त्यात ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, जगदीश जगताप, दिवंगत महाराष्ट्र केसरी संजय पाटील आदींनी महत्त्वाची भूमीका बजावत उंडाळकरांच्या बाजार समितीतील ३७ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावला. हे ऐतिहासिक सत्तांतर झाले. गेल्या सहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. तालुक्याच्या राजकीय पटलावर बरेच बदल झाले. विधानसभा निवडणुकीनंतर पराभूत झालेले उंडाळकर व भोसले गट अचानकपणे एकत्रित आले हा त्यातीलच एक महत्त्वाचा बदल. या मैत्रिपर्वाने जिल्हा मध्यवर्ती बँक, कृष्णा कारखाना आणि बाजार समिती निवडणुकीतही यश मिळविले. उंडाळकरांना डॉ. अतुल भोसलेंसह उत्तरचे युवा नेते धैर्यशिल कदम, शेतकरी संघटनेचे नेते मनोज घोरपडे यांचीही मोलाची साथ लाभली हे निश्चित. त्यामुळे सभापती उपसभापती निवडीत सत्तेचा समतोल कसा राखला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सभापती पदासाठी सध्या उंडाळकर गटाचे कऱ्हाड दक्षिणमधील निष्ठावंत पाईक पैलवान शिवाजीराव जाधव, उत्तरेतील हिंदूराव चव्हाण व अशोक पाटील यांची नावे चर्चेत आहेत.याशिवाय उपसभापतिपदासाठी मोहनराव माने यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती पदाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गोपनीय बैठकीबाबत नेत्यांची चुप्पी..!सभापती, उपसभापतिपदी नेमकी कोणाची वर्णी लावायची याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात असले तरी सोमवारी दुपारी एका गोपनिय ठिकाणी विजयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या काही प्रमुख नेतेमंडळींची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. मात्र बैठकीत नेमके काय ठरले याबाबत कोणीही काही सांगायला तयार नाही. उत्तर-दक्षिणला अडीच-अडीच वर्षांची संधी शक्य !सभापती उपसभापती पदासाठी इच्छूकांची असणारी गर्दी तसेच दक्षिण-उत्तरचा व नव्या-जुन्यांचा मेळ घालताना नेत्यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अडीच-अडीच वर्षांच्या दोन टप्पे करून चार जणांना संधी द्यावी. म्हणजे कऱ्हाड उत्तर आणि दक्षिण मधील एका-एकाला सभापती उपसभापती पदाची संधी मिळेल. असाही एक विचार बैठकीत पुढे आल्याचे समजते.
जुनेच पैलवान की नव्या खेळाडूंना संधी?
By admin | Published: September 21, 2015 8:57 PM