सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनानंतर आता व ओमायक्रॉन या विषाणूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी फलटण तालुक्यातील रुग्णांचे तपासणी अहवाल ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.सातारा जिल्ह्यामध्ये ३७६ लोक परदेशातून नुकतेच आलेले आहेत. कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात पसरल्याने सातारा जिल्हा प्रशासनाने देखील विशेष काळजी घेतलेली आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे तसेच संशयित रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.फलटणमधील चौघेजण परदेशांतून आले होते. या चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या चौघांनाही ओमायक्रॉनची बाधा झाली आहे का ? याबाबत ६ दिवसांपूर्वी त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेकडून शनिवारी जिल्हा प्रशासनाला अहवाल प्राप्त झाले आहेत. या चौघांपैकी तीन जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात म्हटले आहे.जिल्ह्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरली होती. जिल्ह्यामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर साडेसहा हजारांच्या वर लोकांना धोरणामुळे जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या करुन आटोक्यात येतोय असे दिसत असतानाच ओमायक्रॉनने डोके वर काढल्याने जिल्ह्यात चिंता वाढली आहे.ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तोंडाला कायम मास्क लावणे, सॅनिटायझर, हँड वॉशने हात धुणे, गर्दी न करणे सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे हे आवाहन प्रशासन वेळोवेळी करत आले आहे, आताही याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, फलटण तालुक्यात तीन रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 2:40 PM