सातारा : महाबळेश्वरातील मुकदेव घाटामध्ये दोन दिवसांपूर्वी एक टेम्पो कोसळल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी तापोळा रस्त्यावरील चिखली येथे दोनशे फूट खोल दरीत टेम्पो कोसळला. यामध्ये तीन जण झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री साडेदहा वाजता झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, महाबळेश्वरातील मेटगुताड येथून इलेक्ट्रिक साहित्य घेऊन रविवारी सायंकाळी टेम्पो तापोळ्याकडे निघाला होता. चिखली शेड परिसरातील वळणावर आल्यानंतर टेम्पोचा अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे हा टेम्पो थेट दोनशे फूट दरीत कोसळला. अपघातानंतर टेम्पो झाडामध्ये अडकला. या टेम्पोमध्ये तीन युवक होते. ते जखमी झाले आहेत. रात्रीच्या अंधारात यातील एक युवक झाड, फांद्यांच्या आधाराने मुख्य रस्त्यावर आला आणि अपघाताची माहिती त्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दिली.
या अपघाताची माहिती मिळताच चिखलीचे ग्रामस`थ तसेच सहयाद्री ट्रेकर्सचे किरण चव्हाण संजय पार्टे व दीपक जाधव यांनी अंधारात बॅटरीच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिका तसेच शिवसेनेचे संतोष जाधव यांच्या खासगी गाडीने ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. श्रीकांत गणपत बावळेकर (वय २४), विजय बजरंग मोरे ( वय २५), व सुरज यशवंत घाडगे ( वय २६, रा. महाबळेश्वर ) अशी जखमींची नावे आहेत.
या अपघातात एका युवकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर तिसऱ्या युवकाच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. वाई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या टेम्पोमध्ये फ्रिज, टीव्ही आदी इलेकट्रीक वस्तू होत्या. या वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी मुकदेव येथे अपघातात ४० जण जखमी झाले होते. महाबळेश्वर तालुक्यातील दोन दिवसांत घडलेली अपघाताची ही दुसरी घटना आहे.