चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील म्हावशी जिल्हा परिषद गटातील व चाफळ पंचायत समिती गणात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतराला वेग आला आहे. दोन्ही गटांत परस्परविरोधी चढाओढ पाहायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वी सडावाघापूर येथील सरपंचांसह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याची सल काढत राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी खोणोली येथील शिवसेनेच्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांच्या समवेत जाहीर प्रवेश करून घेतला आहे. या दोन्ही घटना आगामी निवडणुकीची नांदी समजल्या जाऊ लागल्या आहेत.काही दिवसांपूर्वी सडावाघापूर येथील मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे रघुनाथ दंडिले यांनी गटाअंतर्गत नाराजीतून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सदस्यासह शिवसेनेत जाहीर प्रवेश करत राजकीय ठिणगी पेटवली होती. याची सल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होती.सडावाघापूर येथील पक्ष प्रवेशाला एक महिना उलटताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राजेश पवार व गटाच्या शिलेदारांनी देसाई गटाचे कट्टर समर्थक भरत साळुंखे यांना धक्का देत खोणोली येथील शिवसेनेच्या विद्यमान सरपंचांसह दोन सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शंभरभर कार्यकर्त्यांच्या समवेत जाहीर प्रवेश करून घेतला.गेली २५ वर्षे खोणोली ग्रामपंचायतीवर देसाई गटाची तर सडावाघापूर ग्रामपंचायतीवर पाटणकर गटाची एकहाती सत्ता होती. या दोन्ही गावातील पक्षांतरामुळे राजकीय गोटात पक्षप्रवेशाचे धुमशान सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.एकूणच पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील म्हावशी जिल्हा परिषद गटातील व चाफळ पंचायत समिती गणात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतराला वेग आला आहे. मतांच्या बेरजेचे राजकारण सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे.राजकीय धुसफूस सुरूच...पाटण विधानसभा मतदारसंघातील म्हावशी जिल्हा परिषद गट तालुक्याच्या राजकीय उलथापालथीत नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. या गटातील चाफळ पंचायत समिती गणात सध्या विकास कामांबरोबरच पक्षांतराचे राजकीय धुमशान सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने ही राजकीय धुसफूस सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
ZP Election: चाफळ विभागात राजकीय धुमशान, पक्षांतराला आला वेग; शिवसेना, राष्ट्रवादीत चढाओढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 4:10 PM