मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने चाकात अडकलेली दुचाकी तीन किलोमीटर फरपटत नेली. कंटेनरच्या चाकाखाली दुचाकीच्या जाळ-धुराचा थरार अनुभवाला मिळाला. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वाराने पाय काढून घेतल्यामुळे अनर्थ टळला. पाच किलोमीटर पाठलाग करून कंटेनर चालकाला पकडून बेदम चोप दिला. हा अपघात पाचवड फाटा ते कोयना वसाहत परिसरात काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अजय काशीनाथ साळुंखे (रा. व्हनगळ, गोवे, ता. सातारा) हे सातारा येथील कदम इंजिनिअरिंग येथे नोकरी करतात. सोमवारी पाच वाजता कामावरून सुटी झाल्यावर ते दुचाकी (एम एच ११ बीबी ५०८१) वरून ओंड येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या पत्नीकडे गेले होते. घरातल्यांना भेटून रात्री परत गावाकडे जात होते. ओंडवरून निघाल्यानंतर चांदोलीकडून कऱ्हाडच्या दिशेने निघालेल्या कंटेनर (एचपी ६४ ए २४७६) चा चालक भरधाव वेगात चालवत होता. साळुंखे यांनी कंटेनरला ओव्हरटेक करून पुढे आले. फोन आला म्हणून ते पाचवड फाटा येथे चौकातच गाडी एका दुकानासमोर लावून गाडीशेजारी उभे होते. पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनर चालकाने साळुंखे दुचाकीसह थांबलेल्या वळणावर दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी कंटेनरच्या मधल्या चाकात अडकवून पाचवड फाटा ते विरंगुळा हॉटेल तीन किलोमीटर फरपटत नेली. यावेळी महामार्गावर दुचाकी घासून जाळ धूर व ठिणग्या उडत होत्या.हॉटेल विरंगुळाजवळ आले असता कंटेनरचा टायर फुटल्याने मोठा आवाज झाला. अडकलेली दुचाकी यामुळे महामार्गावर पडली. मात्र चालकाने कंटेनर तसाच पळवला. दुचाकी मालकासह नागरिकांनी कंटेनरचा कोयना वसाहतीपर्यंत पाठलाग करून पकडले. खाली उतरवून बेदम चोप दिला. तोपर्यंत या अपघाताची माहिती पोलिसांसह महामार्ग देखभाल विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच अपघात विभागाचे हवालदार धारज चतूरसह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. चालकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवून रूग्णालयात दाखल केले. तर पंचनामा करून वाहने ताब्यात घेतली.
Satara: कंटेनरच्या चाकाखाली अडकल्याने दुचाकीचा जाळ-धुर संगटच, पाठलाग करून चालकाला बेदम चोप
By दीपक शिंदे | Published: September 05, 2023 6:33 PM