ओमकार राजेंद्र थोरात (वय २७) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ओंड येथील जगदंबा पेट्रोल पंपापासून उंडाळेकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावरून ओंकार थोरात शेतात निघाला होता. या परिसरात दक्षिण मांड नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावरून जात असताना एका विहिरीजवळ बिबट्या व त्याचा बछडा अचानक शेतातून बाहेर पडले. बिबट्याची मादी पुढे निघून गेली. मात्र त्याच्या मागे असणाऱ्या बछड्याने अचानक ओमकार थोरात याच्या दुचाकीवर झेप मारली. त्यामुळे ओंकार दुचाकीवरून खाली कोसळला. त्याच्या हातावर बिबट्याने पंजा मारला. त्यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्या हातातून रक्त वाहू लागले. जीव वाचवण्यासाठी जखमी ओंकार याने भीतीने आरडाओरडा केला. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेताच बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर ओंकार भीतीने नजीक असणाऱ्या आपल्या घराकडे निघून गेला. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. त्यानंतर दोन दिवस बिबट्याचा याच परिसरात वावर होता.
ओंड परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून परिसरातील शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. शेतीच्या कामावर परिणाम होत असून वन विभागाने बिबट्याला पकडून सुरक्षितस्थळी सोडावे, अशी मागणी होत आहे.
- चौकट
उसाच्या शेतात वावर वाढला
ओंड, उंडाळे परिसरातील उसाच्या शेतामध्ये बिबट्यासह दोन बछडे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याकडून शेतकऱ्यांवर हल्ला होऊ शकतो, हे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी तांबवे परिसरात बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. काले परिसरातही यापूर्वी त्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे धोका दिवसेंदिवस वाढत असून वन विभागाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.