शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) एसटी स्टँड बसस्थानकातील सुलभ शौचालय चालक रणजित जाधव यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या विनोद वावळे याला खंडाळा न्यायालयाने गुरुवार, दि.२६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ (ता. खंडाळा) येथील रणजित जाधव यांनी एसटी स्टँडमध्ये असणारे सुलभ शौचालय चालविण्याकरिता घेतले आहे. दरम्यान, दि.१९ रोजी नेहमीप्रमाणे रणजित जाधव हा सुलभ शौचालय याठिकाणी उपस्थित असताना त्याठिकाणी विनोद वावळे याची किरकोळ कारणावरून रणजित जाधव यांच्याबरोबर वादावादी झाली.
यावेळी किरकोळ कारणावरून रणजित जाधव याचा गळा आवळत डोके आपटल्याने रणजित जाधव हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. ही घटना सकाळी उघडकीस येताच शिरवळ परिसरात खळबळ उडाली. यावेळी शिरवळ पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या बारा तासांमध्ये विनोद वावळे याच्या मुसक्या आवळत रणजित जाधव यांच्या खुनाचा उलगडा केला. यावेळी विनोद वावळे याला खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने गुरुवार, दि. २६ ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश इंगळे हे करीत आहे.