उंब्रज : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या शिवडे हद्दीतून वाहणाऱ्या उत्तरमांड नदीतील ब्रिटीशकालीन बंधाऱ्यालगतची अंदाजे ७ हजार २०० रुपयांची ७ ब्रास वाळू जेसीबी व डंपरच्या साह्याने बेकारदेशीररित्या उत्खनन करून चोरणाऱ्या एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश मुकूटराव थोरात (रा. कोर्टी, ता. कऱ्हाड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवडेचे गावकामगार तलाठी पद्मभूषण शंकरराव जाधव (४८, रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ४ जुलै रात्री नऊच्या दरम्यान तलाठी पद्मभूषण जाधव यांना शिवडे गावातील एकाचा फोन आला की, उत्तरमांड नदीच्या ब्रिटीशकालीन बंधाऱ्यालगतच्या नदीपात्रातून काहीजण जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे तलाठी पद्मभूषण जाधव त्याठिकाणी गेले. तेथे शिवडे ग्रामस्थ जमा झाले होते त्यांनी सांगितले की, ‘नदीच्या पात्रातून जेसीबी व दोन डंपरने (टिपर) वाळू काढली आहे. यानंतर तलाठी जाधव यांनी अधिक चौकशी करता, त्यांना हे बेकायदेशीर वाळू उत्खनन गणेश थोरात यांनी करुन वाळू चोरुन नेली असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी रात्र असल्याने तलाठी जाधव यांनी दुसऱ्या दिवशी नदीपात्रात जाऊन दिवसा पंचांचे समक्ष पंचनामा केला. तेथून अंदाजे ७ हजार २०० रुपयांच्या ७ ब्रास वाळूचे उत्खनन केल्याचे दिसले. त्यांनी याबाबतचा अहवाल तहसीलदारांना पाठवला आहे. उंब्रज पोलिसात तक्रार दिली असून, पोलीस नाईक असिफ जमादार अधिक तपास करत आहेत.