लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : तौक्ते वादळामुळे जिल्ह्यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने काढलेला आहे. या नुकसानीत लोकांच्या वैयक्तिक मालमत्तेसह सार्वजनिक मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यामध्ये वीज वितरणला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
जिल्ह्यात १७ मे रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यात ठिकाणी दरडी कोसळल्या विजेचे खांब उन्मळून पडले, झाडे कोसळली. अनेक घरांचे पत्रे उडाले व भिंती कोसळल्या. जिल्ह्यातील काही शाळांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार या वादळात एक कोटीचे नुकसान झाले आहे; मात्र पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नेमके किती नुकसान झाले, हे समोर येईल कदाचित यापेक्षाही जास्त नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानंतर महसूल प्रशासनाने स्थानिक कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे सांगितले होते त्यानुसार ढोबळे अंदाजानुसार तलाठी, कृषी कर्मचारी, तसेच ग्रामसेवक यांनी केलेल्या नुकसानीच्या पाहणीनंतर जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार जावळी तालुक्यामध्ये नऊ घरांची पडझड झाली. कोरेगाव तालुक्यात एका घराचे नुकसान झाले. कऱ्हाड तालुक्यात सात घरांची पडझड झाली, तर दोन जनावरांचे गोठे, एक पोल्ट्री शेड व एका शाळेचे मोठे नुकसान झाले. पाटण तालुक्यातील दहा घरांचे नुकसान झाले. महाबळेश्वर तालुक्यात २२ घरांचे, तीन शासकीय इमारतींचे नुकसान झाले. अठरा विद्युत पोल वाहनांचे नुकसान झाले. सात घरांचे, एका शाळेचे नुकसान झाले. १० विद्युत खांबांची नुकसान झाले. आंबा, नारळ, फळबागांचे नुकसान झाले. खंडाळा तालुक्यात विद्युत खांब कोसळले.
जिल्ह्यात विजांच्या तारा, तसेच खांब जमिनीवर पडले. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वीज कंपनीने हे काम उभे करण्याची, तसेच तारा दुरुस्त करण्याचे काम हाती घेतलेले आहे.
पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाला अहवाल जाणार
जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे. अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम नुकसान किती झाले याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.
१७ मे रोजी जिल्ह्यात झालेला पाऊस
सातारा : १९.१०, जावळी : ३२.४०, कोरेगाव : ६.११, कराड : ३२.९२, पाटण : ३५.०८, माण : ०.४२, खटाव : ५.८१, महाबळेश्वर : ९४.७, वाई : १८.१४, खंडाळा : २.४५
जिल्ह्याची सरासरी : २२.५३