दत्तात्रय पवार ।लोकमत न्यूज नेटवर्कसायगाव : सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने जावळी परिसरात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. याची झळ आता वृक्षांना बसू लागली आहे. हे वृक्ष जगविण्यासाठी कुडाळ ग्रामस्थांनी पुुढाकार घेतला आहे. ‘आठवड्यातून एक दिवस वृक्षांसाठी’ या संकल्पनेनुसार ग्रामस्थांनी वृक्ष सवंर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.कु डाळमधील युवक-ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचयात सदस्य, ग्रामस्थांनी कुडाळ गावाला हिरवेगार करण्याची जणू शपथच घेतली आहे. तसेच गावातील तीनशे झाडे जगवण्यासाठी ग्रामस्थ आठवड्यातून एक दिवस झाडांना देत आहेत. प्रत्येक रविवारी गावातून एक दानशूर व्यक्ती पाणी टँकर देत आहे.सध्या वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पक्षाच्या निवाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, कुडाळ येथील युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांनी वृक्षवल्लीचा ध्यास घेतला आहे. गावाच्या परिसरात व बाजारपेठेच्या अवतीभवती वड, पिंपळ, नारळ यासह विविध जातींची जवळपास तीनशे वृक्षांची लागवड श्रमदानातून केली आहे. यासाठी दर रविवारी सरपंच वीरेंद्र शिंदे, महेश पवार, मनोज वंजारी, युवक-ज्येष्ठ नागरिकांसह पन्नास जण एकत्र येऊन श्रमदान करत आहेत. तसेच गावातील दानशूर व्यक्ती या झाडांसाठी पाण्याचा टँकर देत असल्यामुळे ही झाडे ऐन उन्हाळ्यातही हिरवीगार दिसू लागली आहेत.आतापर्यंत गावातील जवळपास गजराज मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, दत्तात्रय शिंदे, सूर्यकांत जोशी, राजूभाई आत्तार, मनोज वंजारी, प्रवीण सपकाळ, भिकू राक्षे, अतुल बावकर यांनी एक-एक पाण्याचा टँकर दिला आहे. तसेच जूनच्या पहिल्या पावसापर्यंत गावातील प्रत्येक व्यक्ती पाण्याचा टँकर देणार आहे. त्यामुळे आगामी वर्षात कुडाळ गाव हे हिरवगार दिसू लागणार आहे.एकजुटीची तालुक्यात चर्चाजावळी तालुक्यातील कुडाळ हे बाजपरपेठेचे गाव आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हे गाव खूप संवेदनशील आहे. मात्र, सामाजिक कामात गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला तसेच नागरिक हे नेहमी एकजुटीने काम करतात. गावातील सर्व नागरिक गावाला हिरवेगार करण्यासाठी राबवित असलेल्या या उपक्रमाचे तालुक्यातील जनतेतून खूप कौतुक होत आहे.
आठवड्यातून एक दिवस वृक्षांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 10:50 PM