सातारा : वाईवरून पाटणकडे निघालेल्या दुचाकीस्वाराचा रायगाव फाट्यावरील पुलावरून खाली कोसळल्याने मृत्यू झाला आहे. प्रकाश तुकाराम शिंदे (वय ५१, रा. मस्करवाडी धामणी, ता. पाटण) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून आणखी एक जण जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश शिंदे व विकास मस्कर हे दोघे जण शनिवारी पहाटे वाई येथे औषध आणण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान ते दोघे पाटणकडे जाण्यास निघाले. रायगाव फाटा येथील पुलावर आले असताना अचानक त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी पुलावरून खाली कोसळी. यात शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर विकास मस्कर हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.