कुडाळ : जावळी तालुक्यातील इंदवली तर्फ कुडाळ येथे मळणी मशीनवर काम करताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून शेतकरी बबन शंकर शिंदे यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १० रोजी सायंकाळी घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, इंदवली तर्फ कुडाळ गावच्या शिवारात बबन शिंदे गव्हाच्या मळणीचे काम करत होते. यावेळी मळणी मशीनचा गिअर अचानक पडला व ट्रॅक्टर सुरू झाला. यावेळी मागे घास काढत उभे असलेले शिंदे ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी सातारा येथे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. यांच्या पश्चात पत्नी व दोन विवाहित मुली असा परिवार आहे. अनपेक्षित झालेल्या या घटनेबद्दल गावातून हळहळ व्यक्त होत आहे. हवालदार शिंदे अधिक तपास करत आहेत.