यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक झाल्यावर ऊर्जा मिळते - अजित पवार
By दीपक शिंदे | Published: March 12, 2024 03:47 PM2024-03-12T15:47:37+5:302024-03-12T15:48:04+5:30
यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्र समृद्ध
कऱ्हाड : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करायला मी आलो आहे. त्यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक झाल्यावर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ऊर्जा, प्रेरणा मिळते. लोकहिताची कामे करताना हीच ऊर्जा फायदेशीर ठरते, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कऱ्हाड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी पवार आले होते. त्यानंतर शहरातील विद्यार्थ्यांनी प्रीतिसंगमावर त्यांना शब्दसुमनांची आदरांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुनील तटकरे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज, राजेश पाटील - वाठारकर, ॲड. आनंदराव पाटील, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सादिक इनामदार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र डुबल, युवराज सूर्यवंशी, सचिन बेलागडे आदी यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळेच आजचा महाराष्ट्र समृद्ध झाला आहे. प्रगल्भ महाराष्ट्र घडलेला आहे. त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवूनच नव्या पिढीने काम करण्याची गरज आहे. राजकारणात कितीही उलथापालथी झाल्या तरी यशवंतरावांचा राजकारणातील आदर्श, त्यांची समाजाच्या सर्वच अंगांना स्पर्श करण्याची पद्धत आणि सर्व स्तरातील लोकांना सोबत घेण्याची किमया साधणे आवश्यक आहे.