जावेद खान -सातारा -नगरपालिका आणि जिल्हा रुग्णालय इमारतीचा वापर अवैध कारणासाठी होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच दुसऱ्याच दिवशी पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. नगरपालिका इमारतीत तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर अधिकारी वॉच ठेवणार असून शंभर रुपयांचा दंडही करण्यात येणार आहे. याची सुरुवात पालिका कर्मचाऱ्यांपासून करण्यात आली असून पालिकेत येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात केले आहेत.‘स्वच्छ सातारा, सुंदर सातारा’ ही मोहीम हाती घेऊन सातारा नगरपालिका विविध प्रयत्न करीत आहे. मात्र, नगरपालिकेच्या इमारतीतच तंबाखू, गुटखा खाऊन इमारतीच्या भिंती रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेला पालिकेतच हरताळ फासला जात असल्याचे बोलले जात आहे. याबाबतचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशीच पालिका प्रशासनाने भिंतीवर थुंकून घाण करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या प्रवेशद्वारात गुटखा, तंबाखू खाणाऱ्यांनी पिचकाऱ्या मारून भिंती रंगविल्याचे दिसते. हे ओंगळवाणे चित्र बदलण्यासाठी पालिका प्रशासन सतर्क झाले असून या निर्णयामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ‘पुडी’ आढळ्यास कारवाईया कारवाईची सुरुवात प्रथम पालिका कर्मचाऱ्यांपासून करण्यात येणार आहे. तसेच तंबाखू, गुटखा चघळत पालिकेत येणाऱ्या अथवा तंबाखू, गुटख्याच्या पुड्या खिशात बाळगाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे या आदेशाचे पालन काटेकोरपणे केले जात आहे.पालिका इमारतीत अस्वच्छता कराणारा पालिकेचा कर्मचारी, अधिकारी असो किंवा नगरसेवक असो सर्वांनाच हा नियम लावून कारवाई करावी.- प्रवीण पाटील, स्वीकृत नगरसेवक
तंबाखूची एक पिचकारी पडणार शंभर रुपयांना!
By admin | Published: June 11, 2015 10:28 PM