भुईंज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील आनेवाडी टोलनाक्यावर टोल मागितल्याच्या कारणावरून पुण्यातील टोळीने दहशत माजवून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली असून, टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला. जखमी कर्मचाऱ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनेवाडी टोल नाक्यावर रविवारी रात्री एक वाजता सातारा पुणे हायवेवरील टोल बूथ क्रमांक एक समोर ( एमएच १२ एन. जे. ३०२) हा कार चालक टोल न भरता पळून जात होता. यावेळी या कारला टोल बूथवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी थांबवले. खेड शिवापूर टोलनाक्यावर आमची पार्टनशिप आहे.त्यामुळे आम्ही टोल देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली.
मात्र, कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरावाच लागेल, असे सांगितले. त्यावरून त्या युवकांनी थांबा तुम्हाला दाखवतो, असे म्हणून कुणाला तरी फोन लावला. त्याचवेळी काहीवेळानंतर विरमाडे बाजूकडून एका अलिशान गाडीतून पाच ते सहा व्यक्ती खाली उतरल्या.
कारमधील युवकांनी आम्हाला मारहाण झाल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे त्यातील एकाने टोल नाका कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. मात्र, सुदैवाने गोळी लागली नाही. या प्रकारामुळे भयभीत झालेले कर्मचारी जीव वाचवण्याचे आकांताने सैरावैरा धाऊ लागले.
टोल नाक्यावरील कर्मचारी विशाल दिनकर राजे (रा. लिंब) हे पळताना पडल्याने संबंधितांनी त्यास दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यादरम्यान व्यवस्थापक विकास शिंदे यांनी चोरगे यांच्या हातातील पिस्तूल काढून घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु त्यानंतर संबंधित हल्लोखोर तेथून पसार झाले.घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, पोलीस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी यांनी कर्मचाऱ्यांसह टोलनाक्यावर धाव घेतली.
जखमी विशाल राजे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके, स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी पहाटेपर्यंत टोल नाक्यावर तळ ठोकून होते.