महाबळेश्वर : वेण्णा लेकपासून जवळच असलेल्या लिंगमळा येथे महाबळेश्वर - पाचगणी रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता टँकर व कार यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये कार रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात कारचालक किशोर वसंत गोळे (वय २५, रा. जगताप हाॅस्पिटलजवळ, बावधन रोड, वाई) हा जखमी झाला.
याबाबत माहिती अशी की, महाड येथून रसायन भरलेला टँकर महाबळेश्वरमार्गे हैद्राबादकडे निघाला होता तर वाई येथून कार महाबळेश्वरकडे निघाली होती. ही दोन्ही वाहने शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान लिंगमळा परिसरातील शिवाय हाॅटेलसमोरील अवघड वळणावर आली असता, दोन्ही वाहनचालकांना समोरील वाहन दिसले नाही. सकाळी रस्ता मोकळा असल्याने दोन्ही वाहने भरधाव वेगात होती. त्यामुळे दोन्ही वाहने सकाळी साडेनऊ वाजता समोरासमोर धडकली. टँकरची जोरात धडक बसल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सात ते आठ फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात कारचालक किशोर वसंत गोळे हा जखमी झाला. दरम्यान, अपघात होताच जवळच असलेल्या हाॅटेल व ढाब्यातील कामगारांसह स्थानिक नागरिक त्याठिकाणी आले व त्यांनी कारमधील जखमी चालकाला बाहेर काढून येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते, परंतु त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला पुढील उपचारासाठी वाई येथील मिशन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर अपघातग्रस्त टँकर फिरल्यामुळे संपूर्ण रस्ताच बंद झाला. अनेक वाहने रस्त्याच्या बाजूने मार्ग काढत जात होती. अशातच एक ट्क रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पावसाळी वातावरणामुळे रस्त्याकडेला चिखल झाला होता. या चिखलात हा ट्रक अडकल्याने महाबळेश्वर - पाचगणी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महाबळेश्वर पोलिसांनी तातडीने क्रेन मागवून रस्त्यात बंद पडलेला टँकर बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या अपघाताची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहन क्षीरसागर, श्रीकांत कांबळे व पुरूषोत्तम जाधव अधिक तपास करत आहेत.
१६ महाबळेश्वर ॲक्सिडेंट
महाबळेश्वर - पाचगणी मार्गावर शनिवारी झालेल्या अपघातामुळे वाहने अडकून पडली होती. (छाया : अजित जाधव)