सातारा : जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. विशेषत: आरोग्य विभागावर प्रचंड ताण आला होता. दिवसाला दीड हजार ते दोन हजार रुग्ण आढळून येत होते. मात्र जिल्ह्यामध्ये कोरोना टेस्टची सुविधा नसल्यामुळे सर्व रुग्णांचे रिपोर्ट पुण्याला पाठवावे लागत होते. परंतु आठ महिन्यांपूर्वी कोरोना टेस्टची सुविधा सिव्हिलमध्ये दाखल झाली. त्या दिवसापासून आजअखेर तब्बल १ लाखजणांची कोरोना टेस्ट केल्याचे समोर आले आहे. हा टप्पा नुकताच ओलांडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिलमधील कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.
जिल्ह्यात गतवर्षी २३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर एक एक करत या आकड्याने दहा हजारांचा टप्पा ओलांडला. कोरोना रुग्णांचे नमुने तपासासाठी घेतल्यानंतर ते नमुने पुण्याला पाठवावे लागत होते. कारण साताऱ्यात कोरोना टेस्टची सुविधा उपलब्ध नव्हती. टेस्टचे नमुने पुण्याहून येण्यास एक दिवसाचा कालावधी लागत होता. हा वेळ जात असल्यामुळे कोरोना बाधितांच्या निकट सहवासात किती लोक आले, हे समजण्यास आरोग्य विभागाला बराच काळ धडपड करावी लागत होती. जून आणि जुलै या दोन महिन्यात तर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली होती. असे असताना सिव्हिलमध्ये कोरोना चाचणी झाली, तर लवकर रुग्णावर उपचार होतील, अशी मागणीही पुढे येऊ लागली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे साताऱ्यात कोरोना टेस्टची लॅब असावी, अशी मागणी केली. ऑगस्ट महिन्यामध्ये सिव्हिलमध्ये कोरोना टेस्ट सुरू करण्यात आली. पहिल्यादिवशी शंभर जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. सिव्हिलमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर कोरोना टेस्टचा वेग आणखी वाढला. महिन्याभरातच हा आकडा पाचशेच्या पुढे गेला. त्यानंतर हळूहळू दिवसाला एक हजार जणांची कोरोना चाचणी होऊ लागली. पंधरा मिनिटात चाचणीचा अहवाल समजू लागल्यामुळे कोरनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाला पुरेसा वेळ मिळाला. त्यामुळे काहीअंशी कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्यास यामुळे मदत झाली. अहोरात्र सिव्हिलमधील कर्मचाऱ्यांनी काम केल्यामुळे तब्बल एक लाख लोकांच्या कोरोना चाचणीचा टप्पा सोमवारी ओलांडला. यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सिव्हिलमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
कोटः सिव्हिलमध्ये कोरोना चाचणीला प्रारंभ झाल्यानंतर लॅबमधील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. एकही दिवस सुट्टी न घेता कर्मचाऱ्यांनी कोरोना टेस्टचा वेग वाढवला. त्यामुळेच कोरोना चाचणीचा एक लाखाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
डॉ. सुभाष चव्हाण- जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा