महाबळेश्वर : माकडाला टोपी घालणे, जॅकेट घालणे अशा गोष्टी आवडतात; पण माकडाला आता महिलांची पर्सही आवडू लागली आहे. अगदी पर्स घेऊन शॉपिंगला जावे, त्याप्रमाणे महाबळेश्वरमधील एका माकडाने सहलीला आलेल्या शिक्षिकेच्या हातातील सुमारे एक लाख रुपये असलेली पर्सच घेऊन सुमारे १०० फूट खोल दरीत उडी मारली. माकडाच्या या मर्कटलीलांमुळे सहलीला आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भीतीने गाळणच उडाली.बेळगाव येथील गजानन भातखंडे हायस्कूलची सहल महाबळेश्वर येथे आली होती. त्यांनी महाबळेश्वर येथील आॅर्थरसीट पार्इंट पाहिला आणि एलफिस्टन पॉर्इंटवर पोहोचले. शिक्षकांसह मुलेही आपापल्यापरीने पर्यटनाचा आनंद घेण्यात गुंग झाली होती. एवढ्यात एका माकडाने शिक्षिकेच्या हातातील पर्सच पळविली. त्यामध्ये आपल्याला खाण्यासाठी काहीतरी असेल, असा त्याचा समज झाला असावा. या माकडाला हटकण्याचा विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रयत्न केला; पण ते माकड झाडावरून थेट खोल दरीत गेले. त्यामुळे सगळ्यांचा भ्रमनिरास झाला.शिक्षिकेच्या या पर्समध्ये विद्यार्थ्यांच्या सहलीचे सुमारे एक लाख रुपये होते. त्यामुळे आता काय करायचे? या चिंतेने सगळे व्यथित झाले. पैसे शोधायचे कुठे आणि पुढील नियोजन करायचे कसे? असा प्रश्न सर्वांनाच पडला. शिक्षिका तर रडायलाच लागल्या. सहलीच्या रंगाचा बेरंग होऊ लागला. जवळचे व्यावसायिक आनंद पवार यांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी महाबळेश्वर येथील ट्रेकर्स जयवंत बिरामणे आणि अनिल लांगी यांना घडलेला प्रकार सांगितला.
दोघेही सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आले. त्यांनी १०० फूट दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. अनेक अडचणींचा सामना करत ते दरीत उतरले. त्यावेळी त्यांना १०० रुपयांच्या नोटांचे एक बंडल सापडला. पुढे आणखी काही अंतरावर गेल्यावर ५०० रुपयांच्या नोटांचा बंडल सापडला; पण अंधार पडल्याने त्यांना दरीतून वर यावे लागले.दुसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा दरीत उतरले.
अगदी खोल गेल्यावर त्यांना २००० रुपयांच्या नोटांचे तिसरे बंडल सापडले. हे सर्व पैसे या ट्रॅकर्सनी सहलीच्या शिक्षकांकडे सुपूर्द केले. सर्व पैसे सापडल्यामुळे मुलांनी आणि शिक्षकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी धाडसी ट्रेकर्सचे कौतुक करून आभार मानले. तसेच क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांनीही बिरामणे आणि लांगी यांचे कौतुक केले.