सातारा : कऱ्हाड येथे महिनाभरापूर्वी एका सहा महिन्यांच्या मुलाचा छातीत कफ अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका मुलाचा अशाच प्रकारे मृत्यू झाला आहे. हीधक्कादायक घटना पाटण तालुक्यातील नवारस्ता येथे रविवारी दुपारी घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील नाडे नवारस्ता येथे राहणाऱ्या काजल अमोल पावस्कर (वय २४) हिची एक महिन्यांपूर्वी प्रसूती झाली होती. तिला मुलगा झाला होता. यामुलाच्या छातीत अचानक कफ झाला. श्वासोच्छ्वास घेताना मुलाच्या छातीतून घरघर, असा आवाज येऊ लागला. त्यामुळे मुलाला त्यांनी तातडीने कऱ्हाड येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. त्या बाळाचे त्यांनी नावही ठेवले नव्हते. या घटनेमुळे पावस्कर कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. नाडे नवारस्ता परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची मल्हार पेठ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही कऱ्हाड येथे एका सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी लहान मुलांच्या संगोपणाचा प्रश्न एेरणीवर आला होता. लहान मुलांचा आजार तातडीने समजून येत नसल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्देवी घटना घडत आहेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुलाचा आजार अंगावर न काढता तातडीने त्याला दवाखान्यात नेणे गरजेचे आहे.