सातारा : भानामती, भूत, हडळ, मुलगाच होईल, मुलगी होणार नाही, अशा भूलथापा मारून लोकांकडून पैसे उकळणाऱ्या विश्वास भालचंद्र दाते (रा. जोशीवाडा यादोगोपाळ पेठ, सातारा) या ज्योतिषाला मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी एक महिना सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सात दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, ज्योतिष विश्वास दाते याने यादोगोपाळ पेठेमध्ये श्री दत्त ज्योतिष कार्यालय सुरू केले होते. कॅन्सर, एड्स अशा ७२ व्याधींवर खात्रीशीर इलाज केले जातील, असे तो सांगत होता. प्रत्येक आजारावर वेगवेगळे औषध देऊन लोकांकडून तो पैसे उकळत होता.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मुराद पटेल (रा. शिरवळ) यांनी १४ मार्च २०१५ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात विश्वास दाते याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी दातेला अटकही केली होती. सहायक फौजदार शेडगे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने विश्वास दाते या ज्योतिषाला एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.सरकारी वकील पुष्पा जाधव-माने यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे सहायक फौजदार शशिकांत भोसले, एस. जी. जाधव यांनी सहकार्य केले.