सातारा : वायरमनला मारहाण केल्याप्रकरणी रोहिदास हरिभाऊ चव्हाण (रा. साठे, ता. फलटण) याला चौथे जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर. पवार यांनी १ महिना साधी कैद व एक हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १० दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, साठे, ता. फलटण येथील मेन लाईल तुटली होती. ही लाईन दुरुस्त करण्यासाठी वायरमन नीलेश हणमंत भोकरे (रा. फलटण) हे तेथे गेले होते. त्यावेळी चव्हाण याने तुमच्यामुळे माझा ऊस पेटला, असे म्हणून त्यांच्या कानाखाली मारली. तसेच शासकीय कामात अडथळा आणला.
ही घटना २१ फेब्रुवारी २०१५ रोजी घडली होती. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. हवालदार कांबळे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने रोहिदास चव्हाण याला एक महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे एम. यु. शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी कॉन्स्टेबल मुस्ताक शेख यांनी सहकार्य केले.