नवनाथ जगदाळेदहिवडी : पिंगळी खुर्द येथील राहुल पवार हा अवैध दारूची वाहतूक करून घेऊन जाणार असल्याची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी सापळा रचून त्याला मुद्देमालासह पकडण्यात आले. त्यांच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना राहुल लालासाहेब पवार (रा. पिंगळी खुर्द, ता. माण) हा विनापरवाना दारूची वाहतूक करणार आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सातारा ते गोंदवले बुद्रूक रस्त्यावर सापळा रचला. यावेळी कार (एम. एच. ०८, सी. १४७४) मधून देशी, विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या राहुल पवार याला पकडले. तसेच त्याच्याकडील ३ लाख ५३ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक निर्मळ, सहायक फौजदार प्रकाश हांगे यांनी केली आहे.
दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या, एकाला अटक; दहिवडी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 3:25 PM