फलटण : पुण्यावरून फलटण येथे आलेल्या एका युवकाला कोरो नाची लागण झाली आहे. २५ एप्रिल रोजी ताप आणि खोकला असल्याने त्याने घरी न जाता थेट फलटण उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले असता तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्याहून आलेल्या या व्यक्तीचे संपर्क शोधण्यात आले असून त्यांची संख्या १७ आहे. त्यात फलटण मधील ६ आणि पुण्यातील ११ जण आहेत. त्या व्यक्तीचा फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय वगळता इतर नागरिकांशी संपर्क आल्याचे दिसून येत नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार साबणाने हात धुणे सारख्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असून बाहेरगावावरुन आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनास देणे आवश्यक असल्याचे फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले आहे.
स्थानिक व बाहेरगावावरुन आलेल्या आणि खोकला, ताप आदी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपजिल्हा रुग्णालयात फलटण येथे तपासणी करुन घेणे आवश्यक असल्याचे ही उपविभागीय अधिकारी जगताप यांनी स्पष्ट केले आहे.