वडूज : खटाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी धनाजी लालासो पाटोळे (वय २६, रा. कोकराळे)याच्यावर औंध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी पाटोळे यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.याबाबत माहिती अशी की, पीडित मुलगी ही जनावरे चारण्यासाठी गेली असताना आरोपी धनाजी पाटोळे याने २१ डिसेंबर २०१४ रोजी एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. तसेच याबाबत कोणास काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार, नाही अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर पीडित गरोदर राहिली होती. यासंदर्भात औंध पोलीस ठाण्यात पाटोळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक यू. जी. देसाई व यू. एस. भापकर यांनी केला. पाटोळे विरोधात बाल लैंगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. औंध पोलिसांनी पीडितीचे व साक्षीदारांचे जबाब नोंदविले व पूर्ण तपास करून वडूज जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.सरकार पक्षाच्या वतीने सहायक जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर व अनुराधा निंबाळकर यांनी काम पाहिले. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. वाय. काळे यांनी आरोपी धनाजी पाटोळे याला दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व दंडापोटी दोन हजार रुपये आणि दंड न भरल्यास दोन महिने जादा शिक्षा सुनावली.याकामी सरकारी वकील यांना प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे जयवंत शिंदे, सहायक फौजदार दत्तात्रय जाधव, महिला पोलीस हवालदार व्ही. एल. दडस, पो. कॉ. अक्षय शिंदे, पो. कॉ. सागर सजगणे यांनी सहकार्य केले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास दहा वर्षे कारावास, वडूज न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 6:05 PM