कुडाळ : जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनलने सर्व २१ जागा जिंकून सत्ता राखण्यात यश मिळविले. दीपक पवार यांच्या कारखाना बचाव पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.जावळी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रतापगड साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र कारखाना बचाव पॅनलच्या माध्यमातून दीपक पवार यांनी सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनलला आव्हान दिले होते. रविवारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सुमारे ५२ टक्के मतदान झाले. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मेढा येथील बाबासाहेब शिंदे आखडकर सभागृहात सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत संस्थापक सहकार पॅनलचे महिला प्रतिनिधी गटातून शोभा बारटक्के, ताराबाई पोफळे, तर संस्था बिगरउत्पादक सभासद प्रतिनिधींमधून विठ्ठल मोरे बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित अठरा जागांकरिता ३६ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यात संस्थापक सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मताधिक्याने विजय मिळवला.यात कुडाळ गटातून राजेंद्र शिंदे, सौरभ शिंदे, सुनेत्रा शिंदे, खर्शी-सायगाव गटातून आनंदराव मोहिते, शांताराम पवार, अंकुश शिवणकर, हुमगाव गटातून रामदास पार्टे, आनंदराव शिंदे, प्रदीप तरडे, मेढा गटातून आनंदराव जुनघरे, शिवाजीराव मर्ढेकर,बाळासाहेब निकम, महाबळेश्वर गटातून रामचंद्र पार्टे, जयवंत ऊर्फ नानासाहेब सावंत, दिलीप वांगडे, अनुसूचित जाती- जमाती प्रतिनिधीमधून बाळकृष्ण निकम, भटक्या- विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातून कुसुम गिरीगोसावी, तर इतर मागास प्रवर्गातून विजय शेवते यांनी विजय मिळविला.
प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनलची एकहाती सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 6:56 PM