पुसेगाव : जिल्ह्यात ‘एक गाव, एक गणपती’ या योजनेला पुसेगावातून प्रारंभ झाला होता. गेल्या कित्येक वर्षांची ही परंपरा पुसेगाव व परिसरातील विविध गावांमध्ये आजही सुरू आहे. यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवावा तसेच गणेशोत्सव काळात कोरोना जनजागृतीबरोबरच विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी केले.
पुसेगाव (ता. खटाव) येथील सलोखा सभागृहात कोविड नियमांचे पालन करून हद्दीतील विविध गावांमधील सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभासद तसेच या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंबले यांनी आगामी गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाचे आदेश व परिपत्रक याबाबतची माहिती सांगितली. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी गणेशोत्सव साजरा करताना लोकांनी व सार्वजनिक गणेश मंडळांनी दक्षता बाळगणे आवश्यक असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
विशेषतः गणेशोत्सव काळात कोणत्याही मंडळाने नागरिकांकडून वर्गणी गोळा करताना कोणालाही सक्ती करू नये. प्रत्येक गावात ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबवून कोरोनाचा प्रसार रोखण्यासह मंडळांनी जनजागृतीसाठी योगदान द्यावे. कोरोना कालावधीत उपयुक्त ठरणारी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध गावांमधील मंडळांचे ७० कार्यकर्ते उपस्थित होते.
२१ पुसेगाव बैठक
पुसेगाव (ता. खटाव) पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी मार्गदर्शन केले. (छाया : केशव जाधव)