पळशी : मार्डी (ता. माण) येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी मार्डी गावास नुकतीच भेट देऊन येथील लसीकरणाची माहिती घेतली. याबरोबरच कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत ग्रामस्थांनी यंदा ‘एक गाव, एक गणपती’ या पध्दतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.
मार्डी हे गाव बाजारपेठचे ठिकाण असून, शेजारील वाड्या-वस्त्यावरील लोक मार्डी येथे बाजारासाठी येत असतात. त्यामुळे मोठया प्रमाणात गर्दी होत असते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन समिती व प्रशासन गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गावास भेट देऊन ‘एक गाव, एक गणपती’ पध्दतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांकडूनही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
गेल्या काही वर्षांपासून मार्डी गावाची वेगळी ओळख निर्माण होऊ लागली आहे. पानी फाऊंडेशन, वृक्षारोपण तसेच समृद्ध गाव अशा विविध उपक्रमांत गाव एकजूट दाखवत उल्लेखनीय कामगिरी करत आहे . एक गाव, एक गणपती उत्सव साजरा करण्याचा निर्णय झाल्याने मार्डी ग्रामस्थांचे कौतुक होत आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पोळ, सरपंच संगीता दोलताडे, उपसरपंच संजीवनी पवार, पोलीसपाटील आप्पासोा गायकवाड, राजकुमार पोळ, अशोक पवार, शिवाजी पोळ, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते
फोटो : ०९ मार्डी
दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी मार्डी गावास भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.