लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशात 'एक गाव-एक तिरंगा' हे अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने राबविणार आहे. या अभियानासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात योजना करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यात देखील ११ तालुक्यांसाठी ही योजना करण्यात आलेली आहे, अशी माहिती अभियान प्रमुख स्वप्निल जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यांत २१ ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम व ३७९ गावांतील २५०० कुटुंबांत भारत माता प्रतिमा पूजन व 'घर घर तिरंगा - मन मन तिरंगा' हे ब्रीद घेऊन ७ घरांवर राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहेत. वस्ती, शहर, गाव व तालुकासाठी अभियान प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. या अभियानाच्या माध्यमातून गाव, वस्ती, पाडा व कॉलनीतील घरोघरी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. यावेळी अभाविप जिल्हा संयोजक गौरी वाघ, सहसंयोजक अजय मोहिते, शहर मंत्री निखिल चव्हाण, आकाश शेडगे, अमोघ कुलकर्णी हे उपस्थित होते.