सातारा : पोवई नाका ते शाहू चौक रस्त्याने मॉर्निंग वॉक करताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने एकाला उडवले. यामध्ये संबंधित व्यक्ती गंभीर जखमी असून, हा अपघात रविवार, दि. २४ रोजी पहाटे साडेपाच वाजता झाला. अजय दत्तात्रय निकम (वय ४३, रा. कूपर काॅलनी, गुरुवार पेठ, सातारा) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चंद्रकांत राजाराम घाडगे (वय ७५, रा. राजसपुरा पेठ, सातारा) हे व त्यांचा भाचा अजय निकम हे दोघे रविवारी पहाटे साडेपाच वाजता माॅर्निंग वाॅकसाठी घराबाहेर पडले होते. पोवई नाक्यावरून शाहू चौकातून हे दोघे रस्त्याच्याकडेने चालत जात निघाले होते. त्यावेळी हाॅटेल माउलीजवळ पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने अजय निकम यांना जोरदार धडक दिली.
यामध्ये त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर कोणत्याही प्रकारची मदत न करता अपघाताची माहिती पोलिस ठाण्यात न देता संबंधित कारचालक तेथून पसार झाला. जखमी निकम यांच्यावर साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जखमी निकम यांचा सोमवारी रात्री जबाब नोंदवल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी अनोळखी दुचाकीचालकावर मंगळवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला असून, हवालदार कारळे हे अधिक तपास करीत आहेत.