सातारा : शहरातील वाहतूक कोंडीवर चांगला उपाय ठरणाºया ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून, पालिका मार्गाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झाले आहे. त्यातच महाराजा सयाजीराव विद्यालयात मतदान केंद्र असल्याने पोवई नाका ते पालिका मार्ग मतदानापूर्वी एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या मार्गावरून दुचाकी आणि रिक्षांनाच जाता येणार असलेतरी सातारकरांचा मोठा वळसा थांबणार आहे.
सातारा शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, यासाठी पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असून, या कामाला आता एक वर्ष होऊन गेले आहे. सुमारे ६० कोटी रुपयांचे हे काम असून, डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर या ग्रेड सेपरेटरमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका आणि गोडोली असे तीन मार्ग राहणार आहेत.
प्रथम पालिका मार्गाचे काम हाती घेण्यात आले. सर्वात लांबीचा हा ग्रेड सेपरेटरमधील मार्ग आहे. या मार्गाचे ५७५ मीटरचे काम करायचे असून, त्यापैकी ७० टक्केहून अधिक काम पूर्णत्वास गेले आहे. पोवई नाक्यावर स्लॅब पडला आहे, तसेच मरिआई कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्यावरून दुचाकी, कार, रिक्षांची वाहतूक सुरू झाली आहे. सध्या फक्त रविवारी पेठेत जाणाºया रस्त्यावरील ३५ मीटरचे काम बाकी आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून अंतर्गत तसेच वरूनही पूर्णपणे वाहतूक सुरू होणार आहे. त्यासाठी आणखी दोन महिन्यांहून अधिक वेळ लागू शकतो. तत्पूर्वी पोवई नाका ते पालिका हा मार्ग दुचाकी आणि रिक्षांसाठी सुरू होत आहे.
दि. २३ रोजी लोकसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर नाका-पालिका रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. कारण, निवडणुकीसाठीचे मतदान केंद्र महाराजा सयाजीराव विद्यालयात असून, दिव्यांग मतदारांना अडचण येऊ नये, यासाठी रस्ता खुला करण्याचे काम युद्धपातळीवर चालले आहे.
पालिका मार्ग खुला झाल्यास पोवई नाका आणि मरिआई कॉम्प्लेक्सच्या पाठीमागून येणारी दुचाकी आणि रिक्षासारखी वाहने महाराजा सयाजीराव विद्यालयासमोरून पुढे निघून जाणार आहेत. रविवार पेठेतून वळसा घालून पालिकेकडे येणे थांबणार आहे. परिणामी वेळ वाचून इंधनाचीही बचत होणार आहे.
स्वच्छता, बॅरिकेटस लावण्याचे काम...
पालिका मार्ग एकेरीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मार्गावर स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच खुदाई करण्यात आलेल्या बाजूला बॅरिकेटस लावण्यात येत आहेत. या मार्गावरील रविवार पेठ ते शाहू बोर्डिंगपर्यंतच्या संरक्षक कठड्याचे काम बाकी आहे.
वाहने जाण्यासाठी
६ फूट जागा...
पालिका मार्गावर ग्रेड सेपरेटरचे काही ठिकाणचे काम बाकी आहे. तरीही सध्या वाहतुकीच्या दृष्टीने दुचाकी अन् रिक्षासाठी मार्ग खुला होईल. त्यासाठी २ मीटर म्हणजेच जवळपास ६ ते ७ फूट अंतर असणार आहे. यामधूनच ही वाहने जाणार आहेत.