वेळे : वेळे परिसरातील कोपीचा माळ या शिवारातील व सुरुर येथील दोन व कवठे, बोपेगाव हद्दीतील एक असे एकूण चार शेती वीजवाहिनीचे ट्रान्सफार्मर रात्रीच्या वेळी अज्ञातांनी फोडले. यामुळे ‘महावितरण’चे लाखोंचे नुकसान झाले आहे.
वेळे गावानजीक असलेल्या कोपीचा माळ या ठिकाणी अज्ञातांनी शनिवारी रात्री महावितरणच्या मालकीच्या वीजवाहिनीचा ट्रान्सफॉर्मर फोडला. त्यातून किमती तेल व तांब्याच्या तारा काढून इतर साहित्य चोरीच्या ठिकाणीच ठेवले. त्यातील तेल व तांब्याच्या तारांची किंमत खूप आहे म्हणूनच चोरट्यांनी यावर डल्ला मारला. अगदी नजीकच्या चार दिवसांपूर्वीच कवठे, बोपेगाव हद्दीतील शिवारातही याप्रमाणेच चोरट्यांनी डीपी फोडून पोबारा केला होता तर मंगळवारी रात्री सुरुर येथील चार ट्रान्सफार्मर फोडण्यात आले. चोरटे हे दिवसा पाहणी करून रात्रीच्या वेळीस त्यांचा डाव साधतात.
वाट पाहूनही वीज आली नाही म्हणून शेतकऱ्यांनी ट्रान्सफाॅर्मरकडे धाव घेतली असता त्यांना हा ट्रान्सफाॅर्मर फोडल्याचे लक्षात आले तेव्हा गावातील लाईनमन व वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी तत्काळ स्थळपाहणी करून पोलीस ठाण्यात धाव घेतली. या चोरीबाबत भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
आधीच ‘महावितरण’च्या धोरणाप्रमाणे शेती पंपासाठी उपलब्ध असणारी वीज शेतकऱ्यांना त्रासदायक ठरते आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस देखील शेतकरी आपल्या जीवाशी खेळून पिकांना पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असतो. वीज आली नाही म्हणून शेतकऱ्यांचे देखील नुकसान या चोरट्यांनी केले आहे. महावितरणबरोबरच शेतकऱ्यांचेही नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग देखील वैतागून गेला आहे.
नजीकच्या काही दिवसांत वेळे व सुरुर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामध्ये चोरट्यांनी सायकल, रोख रक्कम, दागिने यांसह अनेक वस्तू लंपास केल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. यात भरीस भर म्हणून महावितरण कंपनीलाही चोरट्यांचा त्रास जाणवू लागला आहे. आता या चोरट्यांना पकडण्याचे आव्हानच चोरट्यांनी पोलिसांना दिले आहे.
(चौकट)
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण....
चोरट्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला असून, ते आपला डाव साधण्याच्या तयारीत आहेत. घरे, दुकाने यासह अनेक प्रकारच्या चोऱ्या होत आहेत. ते आपला मोर्चा विहिरींवरील मोटारीवर देखील वळवू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी आपल्या मोटारींचा विमा काढला तर त्याचा त्यांना फायदाच होईल.
२७वेळे
वेळे परिसरातील कोपीचा माळ या शिवारातील रात्रीच्यावेळी अज्ञातांनी वीजवाहिनीचे ट्रान्सफार्मर फोडले.