सातारा : अलीकडे चोरीच्या पद्धतीचे एक एक किस्से समोर येऊ लागले असून, एकाने दुचाकी चोरायची, चोरलेली दुचाकी दुसऱ्याने विकायची अन् तिसऱ्याने खरेदी करायची, अशी चोरीची अनोखी साखळी पद्धत पोलिसांच्या तपासात उघड झालीय. याबाबत पोलिसांनी तिघाजणांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या सुमारे अडीच लाखांच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
युवराज अकोबा निकम (वय ५३, रा. सदर बझार, सातारा), सोमनाथ साहेबराव जाधव (२५) व स्वप्निल संजय जाधव (२६, दोघेही रा. शिंगणापूर, ता. माण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यातील सदर बझारमधील युवराज निकम हा सराईत आरोपी आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. या व्यसनापायी त्याला दुचाकी चोरीची सवय लागली. साताऱ्यातून दुचाकीची चोरी केल्यानंतर ही दुचाकी तो शिंगणापूर येथील सोमनाथ जाधव याच्याकडे विक्रीसाठी द्यायचा. सोमनाथने स्वप्निल जाधवला दुचाकी विकली. विशेष म्हणजे दुचाकी चोरीची आहे, हे माहीत असूनही स्वप्निलने दुचाकी खरेदी केली. अशाप्रकारे युवराज साताऱ्यातून दुचाकी चोरायचा आणि सोमनाथ पुढे दुचाकीची विक्री करून मोकळा व्हायचा. ही दुचाकी चोरीची साखळी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उघडकीस आणलीय. गेल्या अनेक दिवसांपासून सातारा शहरातून रोज एक तरी दुचाकी चोरीस जात होती. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये खळबळ उडाली होती. आता या टोळीला अटक केल्यामुळे दुचाकी चोरीचे प्रमाण आटाेक्यात येईल, असा विश्वास पोलिसांना आहे.
पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार विश्वनाथ मेचकर, अविनाश चव्हाण, जोतिराम पवार, पंकज ढाणे, सुजित भोसले, अभय साबळे, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला.
फोटो : आहे.