सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून दर ३ हजार रुपये क्विंटलपर्यंत कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांतही समाधानाचे वातावरण आहे. तर वाटाण्याचा दर आणखी कमी झाला आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होते.
सातारा बाजार समितीत रविवारी फळभाज्यांची एकूण ७०८ क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याची १७७ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला १५०० ते ३ हजारांपर्यंत दर मिळाला. तर यावेळी वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. १० किलोला १५० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची लाली अजूनही कमीच आहे. कारण टोमॅटोला ४० ते ५० रुपयांदरम्यानच १० किलोला भाव आला. तर शेवगा, गवारचा भाव कायम असल्याचे दिसून येत आहे.
बोराला भाव कमी...
साताऱ्यात फळांची आवक चांगली आहे. त्यामुळे दरात फारशी सुधारणा नाही. बोरांचा किलोचा दर २० रुपयांपासून पुढे आहे. तर दर्जानुसार सफरचंदाला भाव मिळत आहे.
आले स्वस्त...
जवळपास सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत. गवारला १० किलोला ३५० ते ४५० रुपये दर मिळाला. दोडका १०० ते १५०, कारली १०० ते १५०, बटाट्याला हजारपासून २ हजारांपर्यंत दर १० किलोला मिळाला. आले अजून स्वस्त असून, क्विंटलला १५०० पासून २००० पर्यंत भाव मिळाला.
तेलाचा दर स्थिर...
मागील काही दिवसांत खाद्यतेलाचे दर वाढले. पण, सध्या वायदे बाजार कमी असल्याने दरात थोडासा उतार आला आहे. परंतु, परदेशात खाद्यतेलात तेजीचे वातावरण कायम आहे.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून भाज्यांचे दर स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना चांगले दिवस आले आहेत. तर ग्राहकांचा कल विशेषत: करुन कोबी, टोमॅटो, फ्लॉवर, दोडका खरेदीकडे अधिक आहे.
- रामचंद्र यादव, ग्राहक
बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. कोबी, फ्लॉवर, टोमॅटोला अजूनही दर कमीच मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. आले आणि वाटाणा तर कमी पैशातच विकावा लागतोय.
- ज्ञानेश्वर पाटील, शेतकरी