खटाव : कांद्याने पन्नाशी पार केली आहे. वाढलेल्या दरामुळे खवय्यांना आता कांदाभजीची चव चाखण्यासाठी ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. काही ठिकाणी कांदाभजीला पर्याय कोबीभजी येत आहे.
कांद्याचे चढे दर आणि कांदा हा रोजच्या आहारात अत्यावश्यक असल्याने तसेच हॉटेल, स्वयंपाकघरात नेहमी वापरात असणाऱ्या कांद्याचा वाढता दर पाहता काही दिवसांकरता आता कांद्याला पर्याय असणाऱ्या कोबीचा बऱ्यापैकी वापर होऊ लागला आहे.
कांदाभजी म्हटले की तोंडाला पाणी सुटते. त्याची चवच न्यारी म्हणणाऱ्या खवय्यांना आता बटाटाभजीवर समाधान मानावे लागत आहे. तर कांदाभजीला पर्याय कोबीभजी खाऊन तूर्त तरी समाधान मानावे लागेल. कोबी जरी स्वस्त असला तरी चवीने खाणाऱ्या लोकांना कांदाभजीशिवाय दुसरा पर्याय नकोच वाटल्याचे पाहावयास मिळत आहे.
स्वयंपाक करताना प्रत्येक वेळी भाज्यांना कांद्याची गरज लागते. कांद्याचे घाऊक बाजारातील वाढते दर पाहता आता महिलांनाही हातावर नियंत्रण ठेवावे लागत आहे. जेथे अधिक प्रमाणात कांदा घालावा लागतो तेथे थोड्याच कांद्यावर समाधान मानावे लागत आहे.
कोट
हॉटेलमध्ये ग्राहकांमधून मागणी असेल तरच कांदा घालून भजी केली जात आहे. अन्यथा बटाटाभजी तर असतेच, त्याच्यावर ग्राहकांना समाधान मानावे लागते.
- जब्बार मुल्ला, हॉटेल व्यावसायिक, खटाव