लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : रब्बी हंगामात कांद्याची लागवड करण्यासाठी नियोजनानुसार शेतकऱ्यांनी गेले पंधरा-वीस दिवसांपूर्वी आपल्या शेतात कांद्याच्या रोपाची (तराव) निर्मिती करण्यासाठी कांद्याचे बी टाकले आहे. यापासून रोपे उगवून आली असली, तरी मूळकुज व बुरशीमुळे ती रोपे जळून जात आहेत. स्वतःचे कांद्याचे रोप असावे म्हणून काही शेतकऱ्यांनी अत्यंत मोलामहागाईचे कांद्याचे बी विकत आणून आपल्या शेतात टाकले असून, त्याची जपणूक करताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
खरिपाची सुगी झाल्यानंतर मोकळ्या असलेल्या शेतात कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्याचा कल असतो. तसेच गेल्यावर्षीच्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहेत. काही शेतकऱ्यांनी स्वतःचे कांदा बी, तर काहीजणांनी बी विकत आणून त्यापासून कांदा रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या एककिलो कांद्याच्या बीचा भाव चार ते पाच हजार रुपये आहे, तर एक एकर कांद्याची लागवड करण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार किलो बी टाकणे गरजेचे असते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके निघण्याच्या नियोजनानुसार कांद्याची रोपे (तराव) टाकली आहेत. मात्र, सततच पाऊस व खराब हवामानामुळे कांद्याचे तराव (रोपे) मूळकुज व बुरशी रोगामुळे जागेवरच जळून जात आहेत. वारंवार रोपांवर औषधांची फवारणी करूनदेखील तराव जळून जात असून, टाकलेल्या चार किलो बीच्या तरावात एकरभर लागण्याऐवजी जेमतेम १० ते १५ गुंठे क्षेत्र कांदा लागण होत आहे. एवढे कष्ट घेऊनही शेतात टाकलेले ‘तराव तरत’ नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तराव (कांद्याचे रोप) किमान सव्वा ते दीड महिन्याचे झाल्यानंतर त्याची शेतात लागवड केली जाते. मात्र तराव वाढवतानाच शेतकऱ्यांना फारच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर एक एकर कांदा लागण करण्यासाठी शेतमजूर (रोजगारी ) आठ ते नऊ हजार रुपये घेत आहेत. पुढे-पुढे खते, औषधे, अंतर्गत मशागतीचा प्रचंड खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागत असतो. म्हणजे शेतकऱ्याने एकरी सुमारे ५० ते ६० हजार रुपये खर्चून उत्पादित केलेल्या कांद्याच्या पिकाच्या दराची शेवटी शाश्वती नसते. त्यामुळे शेतकरी वर्गातून कांदा पिकाबाबत चिंता वाढू लागली आहे.
कोट..
गेल्या काही दिवसांपासून उगवलेल्या कांद्याच्या तरावाला पोषक वातावरण मिळत नसल्याने रोपे जागेवरच जळून जात आहेत. रोपाला लागवडीयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक त्रासाबरोबर फार कष्ट घ्यावे लागत आहेत. कांद्यासाठी ठेवलेले क्षेत्र स्वतःच्या तरावाने पूर्ण होत नसल्याने इतर ठिकाणांहून कांद्याचे तराव आणावे लागत आहे. मात्र, त्याचा दर सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने काही शेतकरी स्वतःकडे आहे तेवढ्यावरच कांदा लागवड करत आहेत.
- अविनाश रणसिंग, रणसिंगवाडी
फोटो-
१८पुसेगाव
कांद्याच्या तरावाला बुरशी व मूळकुज रोगावरील औषधांची फवारणी सातत्याने करून कांद्याची रोपे लागवडीयोग्य करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.