सातारा : जिल्ह्यात कांदा दरात वाढ होतच असून, सोमवारी दुसऱ्यादिवशीही सातारा बाजार समितीत क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे कांद्याचा दर ४३०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असले तरी सामान्यांना मात्र, कांदा रडवू लागला आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. यामध्ये कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो.
सातारा बाजार समितीत रविवारी कांद्यात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे दर ४२०० रुपये क्विंटलपर्यंत गेला होता; तर हलक्या प्रतिच्या कांद्याला एक हजारापर्यंत भाव आलेला. सोमवारी दुसऱ्यादिवशीही सातारा बाजार समितीत कांदा दरात सुधारणा झाली. क्विंटलला ४३०० रुपयांपर्यंत दर आला; तर हलक्या प्रतिच्या कांद्याचा दर १५०० रुपये क्विंटलपर्यंत निघाला. यामुळे कांदा महाग होऊ लागल्याचे दिसत आहे. साताऱ्यातील मंडई तसेच दुकानातही कांदा विक्रीचा दर ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे सामान्यांना खर्चात काटकसर करावी लागत आहे.
सातारा बाजार समितीत सोमवारी ५२ वाहनांतून ३३७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याची १६० क्विंटल आवक झाली, तर बटाटा २३८, लसूण २२ आणि आल्याची ४ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक झाली होती. बाजार समितीत गवारला १० किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. रविवारच्या तुलनेत दरात सुधारणा झाली. तसेच शेवग्याला ३०० ते ४०० भाव आला. वांग्याला १० किलोला १५० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटो ४० ते ७०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला ८० ते १३० तर दोडक्याला ३०० ते २५० रुपये दर आला.
बटाट्याला क्विंटलला ७०० पासून १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला २५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १७०० रुपयांदरम्यान दर मिळाला. लसणाला क्विंटलला ३ ते ७ हजारांपर्यंत भाव आला. वाटाणा अजूनही स्वस्त आहे. ३५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.
चौकट :
पालेभाज्यांची आवक कमी...
सातारा बाजार समितीत सोमवारी पालेभाज्यांची आवक कमी झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दरात चढ-उतार पाहायला मिळाला. मेथीच्या एक हजार पेंडीची आवक झाली. याला शेकडा ४०० ते ७०० रुपये दर मिळाला, तर कोथिंबीरच्या १३०० पेंड्यांची आवक झाली. याला शेकडा दर ४०० ते ५०० रुपयांदरम्यान दर मिळाला, तर पालकाला शेकडा ४०० ते ५०० रुपये भाव आला.
......................................................