सातारा : सातारा बाजार समितीत रविवारी कांद्याची आवक कमी झाली तर दर ४२०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला. दरात २०० रुपयांनी वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तर मिरची अन् गवारचा दर तेजीत निघाला. कोबीला अजूनही कवडीमोल भाव आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. सध्या कांद्याची चांगली आवक होत असली तरी दर वाढलेला आहे. तर या रविवारी फक्त १६४ क्विंटल कांदा आला. याला एक हजारापासून ४२०० रुपयांपर्यंत दर आला. मागील १० दिवस कांद्याचा दर ४ हजारांपर्यंत स्थिर होता. रविवारी दरात वाढ झाल्याचे दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. तर बाजार समितीत रविवारी फळभाज्यांची एकूण ५६० क्विंटलची आवक झाली. यामध्ये वांग्याला दर कमी मिळाल्याचे दिसून आले. १० किलोला १०० ते १८० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ५० ते ७० अन् कोबीला २० ते ३० रुपये दर मिळाला.
वाटाणा स्वस्त
बाजार समितीत कांदा, लसूण, गवार, मिरचीचा दर टिकून आहे. मात्र, अनेक भाज्यांना दर मिळत नाही. दोडक्याला १० किलोला ३०० ते ३५० रुपये भाव आला. मिरचीला ३०० ते ४०० रुपये, भेंडी ३५० ते ४२०, शेवग्याला १० किलोला ३०० ते ४०० रुपये भाव आला. आले, वाटाणा अजून स्वस्तच आहे.
कलिंगडाला भाव कमी
सातारा बाजार समितीत सफरचंद, संत्री, चिक्कू, खरबूज, द्राक्षे, कलिंगड तसेच खरबुजाचीही आवक चांगली झाली. बाजारात कलिंगडाचा दर कमी झाल्याचे दिसून आले.
पाऊचचा दर वाढला
मागील काही महिन्यापासून खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. या आठवड्यातही डब्यामागे १०० ते १५० रुपयांची वाढ आहे. सूर्यफूल तेल डबा १९५० ते २२३० रुपयांना मिळत आहे. सोयाबीनचा १९२० ते २१२०, शेंगतेलचा २२५० ते २४५० आणि पामतेल डबा १७८० ते १८३० रुपयांना मिळू लागलाय. तर लिटरच्या पाऊचमागेही वाढ आहे.
साताऱ्यात कांद्याचा दर वाढत असल्याचे दिसून आले. मागील आठवड्यापर्यंत कांद्याचा किलोचा दर ५० रुपयांपर्यंत होता. पण, आता तो ६० रुपयांच्या पुढे जाऊ लागला आहे. यामुळे खर्च वाढत आहे.
- संभाजी नलवडे, ग्राहक
बाजारात कोबी, टोमॅटोला अजूनही चांगला दर मिळत नाही. त्यामुळे खर्च निघणेही अवघड झालेले आहे. मात्र, कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने समाधान वाटते. त्यामुळे चांगले पैसे मिळतील.
- रामचंद्र पाटील, शेतकरी
खाद्यतेलाबाबत पाश्चात्य मार्केट तेजीतच आहे. त्यामुळे मागील महिन्यापासून तेलाचे दर वाढलेले आहेत. या आठवड्यात तेल डब्यामागे १०० ते १५० रुपये तसेच पाऊचमागे पाच ते सहा रुपयांची वाढ आहे.
- संभाजी आगुंडे, तेल विक्री प्रतिनिधी