कुकुडवाड : सालाबादप्रमाणे तालुक्यात दुष्काळाच्या झळा लागायला सुरुवात झाली असूनसुद्धा पाण्याची टंचाई असताना अल्पशा पाण्यामध्ये कुकुडवाडसह व परिसरातील ढाकणी, वडजल, धामणी, नरवणे या भागांत कांदा बीजोत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून त्या प्रमाणात कांद्याला दर मिळत नाही, अशी परिस्थिती असताना शेतकरी कमी पाण्यामध्ये कांदा बीजोत्पादन घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
माण तालुका कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. दरवर्षीचे तालुक्यात पर्जन्यमान नेहमीच शेतकऱ्यांना चटका देत असतो; मात्र तालुक्यातील शेतकरी या परिस्थितीवर कायम मात करीत असल्याने नापिकीमुळे कोणताही शेतकरी हार मानत नाही. त्याचा कायमचा लढा सुरूच असतो. गत खरीप हंगामात दुष्काळी परिस्थिती असताना तालुक्यातील व या कुकुडवाड परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठला आहे. तरीपण, आहे तेवढ्या उपलब्ध पाण्यामध्ये ठिबक सिंचन या पाणीबचतीचा वापर करून कांदा बीजाचे पीक जोपासले जात आहे. कांद्याला सध्या योग्य हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
शासनाच्या धोरणानुसार पिकाचे फक्त उत्पन्न आणि उत्पादन वाढवण्याकडे कल असून काय फायदा. कांद्याला किंवा दुसऱ्या पिकांना योग्य चांगला हमीभाव मिळत नसेल, तर कोणत्याही पिकाचे उत्पन्न आणि उत्पादन वाढवून काय करायचे. शेतकरी दराच्या आशेने कांदा उत्पादन व कांदा बीजोत्पादन करत आहे. मात्र, चांगला योग्य हमीभाव काय मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पुढील हंगामात तरी कांद्याला चांगला दर येईल, या आशेने येथील परिसरातील शेतकरी कांदा बीजोत्पादन घेत आहे. कुकुडवाडसह परिसरात ढाकणी, वडजल, धामणी येथील शेतकऱ्यांनी हळवा वाणाच्या कांद्याचे बीजोत्पादन प्लॉट मोठ्या प्रमाणात घेतले आहे. सध्या हे बीजोत्पादन प्लॉट फुलोऱ्यात असून वाढ चांगली व निरोगी आहे. पूर्व हंगामातील कांद्याच्या बुडक्यांद्वारे कांदा बीजोत्पादन घेतले जात आहे. त्यातून बीज तयार झाल्यानंतर त्याची रोपे बनवून पुन्हा त्याची लागवड जून महिन्याच्या दरम्यान केली जाते. त्याचे उत्पादन ऑक्टोबरच्या दरम्यान येत असते. कुकुडवाड परिसरातील रस्त्यालगतचे कांदा बीजोत्पादनाचे प्लॉट पाहण्यासाठी वाटसरू भेट देत आहेत.
(कोट)
दुष्काळी परिस्थितीमध्ये जमिनीतील पाण्याची क्षमता कमी झाल्यामुळे कमीतकमी पाण्यात ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून कांदा बीजोत्पादन घेतले.
-दादासो काटकर, शेतकरी, कुकुडवाड
(कोट)
कांदा पिकाचे बियाणे बाजारामध्ये भेसळयुक्त मिळण्याची शक्यता असते म्हणून या परिसरातील अनेक शेतकरी पुढील लागवडीसाठी किंवा विक्रीसाठी आवश्यक कांदा बियाण्यांचे बीजोत्पादन हे स्वतः शेतात घेणे पसंत करतात.
-दादासो खाडे, शेतकरी ढाकणी
15कुकुडवाड
फोटो- कुकुडवाड येथील दादासो काटकर यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून सीताफळ बागेत आंतरपीक म्हणून कांदा बीजोत्पादन केले आहे.