सायगाव/सातारा, दि. ६ : कास पठारावरील पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन काही मयार्देपर्यंत पर्यटकांना प्रवेश देऊन वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शनिवार, रविवार आॅनलाईन बुकिंग केले जात होते. मात्र आता पठारावर आॅनलाईन बुकिंग न करता सर्वांसाठी प्रवेश खुला राहणार असून, पठारावरच शुल्क आकारले जाणार आहे.
कास पठारावर गुरुवारी वनविभाग आणि व वन व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
कास रस्त्यावरील रस्ता खचल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू असून, पर्यटकांना कास पठारावर फुले पाहता येणार आहेत. वाहतूक सुरळीत सुरू झाल्यामुळे पर्यटकांची संख्या देखील वाढत आहे.
शनिवार, रविवार आॅनलाईन बुकिंग करणे गरजेचे होते. मात्र आता बुकिंग न करता देखील पर्यटकांना कास पठारावर प्रवेश दिला जाणार असून, पठारावरच शुल्क आकारले जाईल.
वनव्यवस्थापन समिती व वनविभागाने हा निर्णय घेतला असून, कास पठारावर यापुढे बुकिंग करणे गरजेचे नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांनी सांगितले. मात्र अवजड, मोठ्या बसेस सातारा-कास मार्गावरून नेता येणार नाहीत.
मोठ्या वाहनांना कुसुंबी-केळघर मार्गावरून पठारावर यावे लागेल. छोटी वाहने सातारा-कास या मुख्य मार्गावरून जाऊ शकतात.